Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यातला महत्त्वाचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला अन् चाहत्यांच्या आनंदावर पाणी फिरले. एवढी महत्त्वाची मॅच रद्द झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. भारत-नेपाळ या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी प्रमुख नजम सेठी यांनी जोरदार टीका केली आहे. अशा परिस्थितीत मोठे अपडेट्स समोर येत आहेत. आशियाई क्रिकेट परिषद ( ACC) आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ च्या लढती दुसऱ्या ठिकाणी खेळवण्याच्या हालचाली करत आहेत.
भारत-नेपाळ यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाल्यास Super 4 मध्ये कोण जाणार?
कोलंबो येथे मागील काही दिवसांपासून मुसळदार पाऊस पडतोय आणि शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळतेय. त्यामुळे ACC कोलंबो येथील सामने पल्लेकर व दाम्बुला येथे खेळवण्याचा विचार करत आहेत. आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, परंतु BCCI च्या विरोधामुळे हायब्रिड मॉडेलमध्ये ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवली जातेय. भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने पाकिस्तानला त्यांच्याविरुद्धचा सामना श्रीलंकेत खेळावा लागला. पण, हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. नजम सेठी यांनी ट्विट करून सांगितले की, आम्ही दुबईचा प्रस्ताव ठेवलेला, परंतु तो फेटाळला गेला.
पण, आता हाती आलेल्या वृत्तानुसार आशिया चषकाचे पुढचे सामने कोलंबो येथून दाम्बुला येथे खेळवण्यात यावे असे श्रीलंका क्रिकेटने सूचविले आहे. श्रीलंकेतील हा भाग कोरडा आहे, परंतु ब्रॉडकास्टर आणि संघाने दाम्बुला, पल्लेकल व कोलंबो असा प्रवास करण्यास नकार दिल्याचे समजतेय. सुपर ४ मधील पहिला सामना ९ सप्टेंबरला कोलंबो येथे होणार आहे, परंतु हवामान खात्यानुसार मुसळधार पावसाची शक्यत आहे. येत्या २४-४८ तासांत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.