दक्षिण आफ्रिकेत फेब्रुवारी २०२३ मध्ये महिलांची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्यासाठी भारतीय खेळाडू तयारीलाही लागले आहेत. पण, स्पर्धेला दोन महिने असताना BCCI ने मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार ( Ramesh Powar) यांची बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) बदली केली. त्यामुळे महिला संघाच्या प्रशिक्षकपदी आता नवीन व्यक्ती येणार आहे. स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना असा निर्णय घेतल्याने चाहते बुचकळ्यात पडले आहेत. भारताचा माजी फलंदाज हृषिकेश कानिटकर ( Hrishikesh Kanitkar ) याची महिला संघाच्या मुख्य फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. ९ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कानिटकर भारतीय महिला संघाचा फलंदाज प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे.
माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार हे आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यासोबत काम करणार आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल भाष्य करताना हृषीकेश कानिटकर म्हणाला,“वरिष्ठ महिला संघाचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होणे हा सन्मान आहे. मला या संघात प्रचंड संधी दिसत आहेत आणि आमच्याकडे तरुणाई आणि अनुभव यांचा चांगला मिलाफ आहे. मला विश्वास आहे की हा संघ पुढील आव्हानासाठी सज्ज आहे. आमच्यासमोर काही महत्त्वाच्या स्पर्धा येत आहेत आणि ते संघासाठी आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी रोमांचक असेल.”
रमेश पोवार म्हणाला की, “मला वरिष्ठ महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माझ्या कार्यकाळात समृद्ध करणारा अनुभव आला आहे. गेल्या काही वर्षांत मी खेळातील काही दिग्गज आणि देशातील आगामी प्रतिभांसोबत जवळून काम केले आहे. NCA मधील माझ्या नवीन भूमिकेसह, मी भविष्यासाठी प्रतिभा निर्माण करण्यात मदत करण्यासाठी अनेक वर्षांचा माझा अनुभव पुढे नेण्याचा विचार करेन. खेळाच्या पुढील विकासासाठी आणि बेंच स्ट्रेंथसाठी मी व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला,“ रमेश पोवार ऑन-बोर्ड आल्याने, आम्हाला खात्री आहे की ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्यांचे कौशल्य आणि अनुभव आणतील. देशांतर्गत, वयोगटातील क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काम केल्यामुळे, मला खात्री आहे की तो खेळाच्या चांगल्यासाठी सक्रिय भूमिका बजावेल. NCA मध्ये त्याच्या नवीन भूमिकेत त्याच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"