आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) पुढील वर्षी श्रीलंकेत होऊ घातलेला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डात सुरू असलेल्या सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयसीसीने क्रिकेट बोर्डावर अनिश्चित काळासाठी निलंबनाची कारवाई केली होती. आयसीसीची अहमदाबाद येथे बैठक पार पडली आणि आयसीसीने श्रीलंका संघाला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये व द्विदेशीय मालिकेत खेळण्यास परवानगी दिली आहे. पण, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सर्व फंडिंग आयसीसीच्या हाती असणआर आहे.
"निलंबन मागे घेता येणार नाही हा आयसीसीचा एकमताने निर्णय होता. देशातील क्रिकेट नेहमीप्रमाणे सुरू राहील," असे एका सूत्राने क्रिकबझला सांगितले. ICC चे पदच्युत अध्यक्ष सॅमी सिल्वा यांनी मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील ITC नर्मदा येथे झालेल्या बोर्डाच्या बैठकीत हजेरी लावली.
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणार होता. या तारखा १० जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या SA20 च्या दुसऱ्या आवृत्तीत व्यत्यय आणणाऱ्या आहेत, परंतु क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) च्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने क्रिकबझला सांगितले की दोन्ही स्पर्धा एकाच वेळी आयोजित केल्या जाऊ शकतात.
भारतात पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेला नऊपैकी केवळ २ सामने जिंकता आले आणि ते गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही ते पात्र ठरू शकले नाही. भारताकडून झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आले होते. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केली होती. यासोबतच क्रीडा मंत्रालयाने श्रीलंकेतील क्रिकेट सुरळीत पार पाडण्यासाठी अंतरिम क्रिकेट समिती देखील स्थापन केली आहे. या समितीची जबाबदारी श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
Web Title: BREAKING - ICC moves U 19 Cricket World Cup 2024 from Sri Lanka to South Africa.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.