लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : सलामीवीर शिखर धवन, स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर भारताला आज तिसरा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर हा दुखापतग्रस्त झाला आहे. शंकरच्या दुखापतीने भारतीय संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बुधवारी भारतीय संघ सराव करत होता. यावेळी विजय शंकर फलंदाजीचा सराव करत होता आणि त्याला जसप्रीत बुमरा गोलंदाजी करत होता. यावेळी बुमराचा एक चेंडू शंकरच्या पायाला लागला आणि त्यानंतर शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर काही वेळ शंकर बसूनच होता. पण आता त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत आणि तो लवकरच फिट होईल, असे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे.
भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे रिषभ पंतचा मार्ग मोकळा झाला आहे. धवन तीन आठवड्यात दुखापतीतून सावरेल असे सांगण्यात येत होते, परंतु तो सावरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यानं उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. IANSला बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ''धवन वर्ल्ड कप खेळण्यासाठी फिट नसून त्याला रिकव्हर होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल. त्यामुळे तो वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेत आहे,'' असे सूत्रांनी स्पष्ट केले.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून वर्ल्ड कप स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवनदुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला तीन आठवडे संघाबाहेर राहावे लागणार होते, पण आता त्याला स्पर्धेलाच मुकावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत बळावल्याने तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता.