मुंबई, इंडियन प्रीमिअर लीग : देशामध्ये लोकसभा निवडणूकीचा ज्वर चढायला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणूकीमध्ये नेमके काय होणार यावर चर्वितचर्वण सुरु आहे. भारतात ज्या काळात लोकसभेची निवडणूक होणार आहे, त्याचवेळी बीसीसीआयची इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) होणार आहे. त्यामुळे निवडणूकीच्यावेळी ही स्पर्धा भारतात होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. परंतु, मंगळवारी बीसीसीआयने केलेल्या घोषणेत ही स्पर्धा भारतातच होणार असल्याचे स्पष्ट झाले.
काही दिवसांपूर्वी 2019 साली होणारी आयपीएल भारतामध्ये होणार नाही, अशी चर्चा सुरु होती. त्यावेळी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आयपीएल भारतामध्येच खेळवण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. आज झालेल्या बैठकीनंतर आयपीएल भारतात होणार असल्याचे स्पष्ट झाले. मे महिन्यात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता ही स्पर्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होणार आहे.
केंद्रीय आणि राज्यातील अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर आयपीएलचा 12 वा हंगाम भारतातच खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यानुसार ही स्पर्धा 23 मार्चपासून सुरू होणार आहे. निवडणूका एप्रिल आणि मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. ''लीगचे अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी प्रशासकीय समिती संघ मालकांशी चर्चा करणार आहेत,'' असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.