इंग्लंड संघाला गुरुवारी मोठा धक्का बसला. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर यानं २०२१च्या सर्व स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका, इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिका या महत्त्वाच्या स्पर्धांचा समावेश आहे. उजव्या हाताच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे आर्चरनं माघार घेतल्याच्या वृत्ताला इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानंही दुजोरा दिला आहे. त्यामुळे इंग्लंडसह आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघासाठी हा मोठा धक्का आहे.
''मागील आठवड्यात जोफ्रा आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याचे पुन्हा स्कॅन करण्यात आले. त्यातून त्याच्या कोपऱ्यात फ्रॅक्चर असल्याचे समोर आले आहे. २६ वर्षीय गोलंदाजाच्या कोपऱ्यावर मे महिन्यात शस्त्रक्रीया करण्यात आली होती आणि मागील महिन्यात तो मैदानावर उतरला होता. पण, सामन्यात त्याच्या दुखापतीनं पुन्हा डोकं वर काढलं. त्या शस्त्रक्रीयेचा आताच्या दुखापतीशी काही संबंध नाही,''असे ECBनं स्पष्ट केलं.
मागील आठवड्यात इंग्लंड संघाचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने काही काळासाठी क्रिकेटपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. स्टोक्सने वैयक्तिक कारणामुळे भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली. सध्या आपण क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यासाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याचेही त्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डला (ईसीबी) कळवले. कोरोना महामारीदरम्यान सर्वच क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवत आहेत. मात्र याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होताना दिसत आहे. यामुळेच स्टोक्सने काहीवेळ ब्रेक घेतल्याचे म्हटले जात आहे. आयसीसीनेही स्टोक्सने ब्रेक घेतल्याच्या निर्णयाची माहिती दिली. ईसीबीने स्टोक्सचा हा निर्णय धाडसी असल्याचे म्हटले.