IND vs ENG 3rd Test : भारतीय संघातील प्रमुख फलंदाज केएल राहुल ( KL Rahul) राजकोट येथे १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून भारतीय संघातून बाहेर पडला आहे. निवड समितीने उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी कर्नाटकच्या फलंदाजाची संघात निवड केली आहे. शनिवारी संघाची घोषणा करताना, बीसीसीआयने निवेदनात म्हटले होते की “ रवींद्र जडेजा आणि केएल राहुलचा सहभाग वैद्यकीय संघाच्या फिटनेस मंजुरीवर अवलंबून असेल.”
BCCI ने दिलेल्या माहितीनुसार, राहुल अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. पण, रवींद्र जडेजाला मालिकेतील तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. राहुलच्या उपलब्धतेवर निर्णय घेण्यासाठी आणखी एक आठवडा त्याचे निरीक्षण करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले. राहुल अजूनही एनसीएमध्ये आहे आणि तो राजकोटला गेला नाही. बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला आशा आहे की राहुल चौथ्या कसोटीपर्यंत तंदुरुस्त होईल.
हैदराबादमधील पहिल्या कसोटी सामन्यात दुखापतीच्या तक्रारीमुळे राहुलला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले होते. विराट कोहलीच्या अनुपस्थित लोकेश राहुल हा संघातील अनुभवी फलंदाजांपैकी एक होता, परंतु आता तोही नसल्याने कर्णधार रोहित शर्माच्या चिंतेत भर पडली आहे. त्यात श्रेयस अय्यरलाही उर्वरित तीन कसोटी सामन्यांत बाकावर बसवले गेले आहे.
दरम्यान, कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याचा संघात समावेश केला गेला असल्याची माहिती समोर येत आहे. रणजी करंडक स्पर्धेतील नुकत्याच एका सामन्यात देवदत्तने १५१ धावांची खेळी केली होती. कर्नाटक विरुद्ध तामीळनाडू हा सामना पाहण्यासाठी निवड समिती प्रमुख अजित आगरकर स्टेडियमवर उपस्थित होते. त्याआधी देवदत्तने रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पंजाबविरुद्ध १९३, नंतर गोवाविरुद्ध १०३ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारत अ संघाकडून खेळाताना इंग्लंड लायन्सकडून १०५, ६५ व २१ धावा त्याने केल्या होत्या.
भारताचा अपडेटेड संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल , रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप