T20 World Cup 2022 : जसप्रीत बुमराहच्या जागी कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात निवड झालेल्या जसप्रीतची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत पाठ दुखावली आणि त्याला माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी मोहम्मद शमी व दीपक चहर या दोन गोलंदाजांपैकी एकाचा मुख्य संघात समावेश करण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी शमीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यालाही माघार घ्यावी लागली. मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर शमी मर्यादित षटकांचे सामने खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या फिटनेसची चाचणी करण्यात आली आणि आज NCA तून त्याचा रिपोर्ट आला.
ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यास मैदानावर उतरला. आशिया चषक २०२२ स्पर्धेला मुकल्यानंतर प्रमुख गोलंदाज जसप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. तीन सामन्यांपैकी दोनच सामने तो खेळला, परंतु काही खास कामगिरी झाली नाही. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढले आणि तो बंगळुरू येथील NCA येथे दाखल झाला होता. आता हाती आलेल्या बातमीनुसार त्याच्या पाठीची दुखापतीमुळे त्याला ४-६ आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.
राखीव गोलंदाज दीपक चहरने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२०त दमदार कामगिरी केले आहे. त्यामुळे त्याचेही नाव चर्चेत आहेच. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी त्याच्याही पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढलं. त्याला त्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आणि त्याने अद्याप NCA त फिटनेस टेस्ट दिलेली नाही. दरम्यान, शमी फिटनेस टेस्टमध्ये पास झाला असून तो श्रेयस अय्यर व रवी बिश्नोई या राखीव खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्यांच्यासोबत मोहम्मद सिराजही असणार आहे, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत सिराजने दमदार कामगिरी केली आहे. चहर वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"