इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात माजी विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) प्ले ऑफमधील स्थान टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यात मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम ( Brendon McCullum ) व कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यातला संवाद फार काही चांगला नसल्याच्या चर्चा आहेत. त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होत असल्याचे बोलले जात आहे, अशात ब्रेंडन मॅक्युलम आयपीएल २०२२नंतर KKRचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार असल्याचे वृत्त येऊन धडकले आहे. त्यामागे कारण मात्र दुसरे आहे.
ब्रेंडन मॅक्युलम याच्याकडे इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ( ECB) गुरुवारी ही घोषणा केली. ECB ने नुकतीच कसोटी संघाच्या कर्णधारपदी बेन स्टोक्सची निवड जाहीर केली आणि त्यात आता ब्रेंडन मॅक्युलमच्या निवडीने इंग्लंडचे कसोटी क्रिकेट नव्या युगात प्रवेश करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका १-० अशी गमावल्यानंतर जो रूटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याआधी ख्रिस सिलव्हरवूड यांनी अॅशेल मालिकेतील ४-० अशा पराभवानंतर पद सोडले होते.
आयपीएलमध्ये मॅक्युलमकडे कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षकपद आहे आणि कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील त्रिनबागो नाईट रायडर्सच्या प्रशिक्षकपदीही तोच आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ मध्ये इंग्लंडची कामगिरी सुधारण्याचे प्रमुख लक्ष्य आता मक्युलम समोर आहे. इंग्लंडचा संघ गुणतालिकेत तळाला आहे. ''इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. संघाला यशस्वी करणे हेच माझे लक्ष्य आहे,''असे मॅक्युलम म्हणाला. या नव्या जबाबदारीमुळे मॅक्युलम KKRचे मुख्य प्रशिक्षकपद सोडण्याची शक्यता आहे.