Covid scare in India Under-19 team : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघात कोरोनानं शिरकाव केला आहे. कर्णधार यश धुल आणि उप कर्णधार एसके राशीद यांच्यासह भारतीय संघातील ६ खेळाडूंना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि या सर्वांना विलगिकरणात जावे लागले आहेत. त्यामुळेच आजच्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात निशांत सिंधू याची प्रभारी कर्णधार म्हणून निवड केली गेली आहे. सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे भारताला संतुलित संघ मैदानावर उतरवता आलेला नाही. भारत १७ सदस्यीय संघासोबत स्पर्धेत दाखल झाला आहे.
धुल आणि राशीद यांच्या व्यतिरिक्त मानव परख, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि वासू वत्स यांना विलगिकरणात जावे लागले आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनातील सदस्यांना सामना सुरू असताना मैदानावर शितपेय घेऊन यावं लागलं. ''कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंच्या संपर्कात काही खेळाडू आले आहेत आणि खबरदारी म्हणून आम्ही त्यांना विलगिकरणात जाण्यास सांगितले आहे,''असे सूत्रांनी Cricbuzz ला सांगितले.
अंग्रीश रघुवंशी व हरुन सिंगचे अर्धशतकआयर्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना अंग्रीश रघुवंशी व हरुन सिंग यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी केली. रघुवंशी ७० चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ७९ धावांवर बाद झाला. हरुनही १०१ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीनं ८८ धावांवर माघारी परतला. भारतानं ३५ षटकांत २ बाद १९५ धावा केल्या आहेत.