लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकामध्ये वेस्ट इंडिजला आता मोठा धक्का बसला आहे. कारण अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला आता विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. दुखापतीमुळे रसेल यापुढे विश्वचषकातील एकही सामना खेळू शकणार नाही. रसेलच्या जागी सुनील अम्ब्रिसला संघात स्थान देण्यात आले आहे.
यापूर्वीही रसेलला दखापत झाली होती. पण त्यानंतर रसेल गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरला होता. पण रसेलची गुडघ्याची दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. या दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्यामुळे रसेलला विश्वचषकातून बाहेर पडावे लागणार आहे.
पाकिस्तानला सुरुवातीलाच धक्के देत विंडीजच्या विजयाचा पाया रचला. पण, या सामन्यात रसेलला दुखापत झाल्याचे वृत्त होते. सामन्यादरम्यान त्याने वैद्यकीय मदतही घेतली. त्याने 4 षटकंच टाकली आणि त्यात चार धावा देत दोन विकेटही घेतल्या. ''रसेलला प्राथमिक उपचार घ्यावे लागले होते. पुढील काही दिवस त्याच्या दुखापतीवर आम्ही नजर ठेवून असणार आहोत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो तंदुरूस्त होईल, अशी खात्री आहे.
रसेलला नक्की काय झालं, हे मीही 100 टक्के खात्रीनं सांगू शकत नाही,''असे मत विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केले. विंडीजने 14 षटकांतच सामना जिंकल्यामुळे रसेलला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तो म्हणाला,'' गेला वर्षभर मी गुडघ्याच्या दुखापतीनी त्रस्त आहे. काही वेळा या वेदना असह्य होतात, परंतु मी एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी काय करायचे, हे मला माहीत आहे. माझ्याकडे पाच दिवसांचा कालावधी आहे आणि मी तोपर्यंत पूर्णपणे तंदुरूस्त होईन.''