लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या महान फलंदाजांचे नाव एकेकाळी भरपूर गाजले होते. हे दोघे सलामीला यायचे आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजीची हवा काढून टाकायचे. या दोघांचे तेव्हा सूर चांगलेच जुळत होते. या दोघांमध्ये चांगली मैत्रीही होती. पण आता भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी गांगुलीने चक्क सचिनशी पंगा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
गांगुलीने सचिनच्या टीकेवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सचिनवर अप्रत्यक्षरीत्या टीका करताना गांगुली म्हणाला की, " अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनीकडून अपेक्षित कामगिरी झालीही नसेल. पण धोनी एक महान फलंदाज आहे. या सामन्यानंतरही धोनी एक क्लासिक फलंदाज राहणार आहे. त्यामुळे फक्त एका सामन्यावरून धोनीवर टीका करणे योग्य नाही."
काय आहे प्रकरणअफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत 26व्या षटकात धोनी फलंदाजीला आला. पण, त्याचा खेळ इतका संथ होता की चाहतेही त्याच्या बाद होण्याची प्रतीक्षा पाहू लागले. धोनीनं या सामन्यात 52 चेंडूंत 28 धावा केल्या. मधल्याफळीत धोनी व जाधव यांनी 57 धावांची भागीदारी केली, परंतु धावांचा वेग फारच संथ होता. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तेंडुलकरनेही धोनी व जाधवच्या संथ भागीदारीवर नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,''मी निराश झालो, यापेक्षा चांगली खेळी करता आली असती. धोनी व जाधव यांच्या भागीदारीवर मी असमाधानी आहे. ती अत्यंत संथ भागीदारी होती. आम्ही फिरकीपटूंच्या 34 षटकांत केवळ 119 धावाच करू शकलो. याचा गांभीर्यानं विचार होण्याची आवश्यकता आहे.''
तो पुढे म्हणाला,''प्रत्येक षटकात 2-3 निर्धाव चेंडू खेळले गेले. 38व्या षटकात विराट कोहली माघारी परतल्यानंतर 45व्या षटकापर्यंत आपण अधिक धावा केल्याच नाहीत. मधल्या फळीकडून आतापर्यंत अपेक्षित योगदान मिळालेले नाही आणि त्यामुळे अन्य फलंदाजांवर दडपण येत आहे.'' तेंडुलकरच्या या टीकेनंतर धोनी चाहते खवळले आणि त्यांनी मास्टर ब्लास्टरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावेळी धोनी समर्थकांनी तेंडुलकरला त्याचा काही संथ खेळीचीही आठवण करून दिली.
सचिनला मारले होते टोमणेभारतीय संघाचे सलामीवर अपयशी ठरले की कोणतं संकट ओढावू शकते, याची प्रचिती अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात आली. विराट कोहली व केदार जाधव वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. मधल्या फळीत विजय शंकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी निराश केले. अफगाणिस्तानविरुद्ध भारताला केवळ 224 धावाच करता आल्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात संथ खेळी खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीवर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने टीका केली. त्याच्या या टीकेला चाहत्यांनी सडेतोड उत्तर दिले. सचिन तू वर्ल्ड कप जिंकलास तो धोनीमुळेच, असा खोचक टोमणाही अनेकांनी मारला आहे. त्यामुळे धोनीवर टीका करणं तेंडुलकरला महागात पडले.