मुंबई : सध्याच्या घडीला महेंद्रसिंग धोनीचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. बीसीसीआयने वार्षिक करारांमधून धोनीचे नाव काढून टाकले आणि वादाला तोंड फुटले. काही जणांना तर धोनीने निवृत्ती घेतली असेच वाटले. पण कोणी काहीही म्हणो, धोनी मात्र क्रिकेटच्या सरावाला लागला आहे.
धोनी हा कधीही टीकाकारांना तोंडाने उत्तर देत नाही, तर तो आपल्या कृतीमधून त्यांची तोंडं बंद करतो. त्यामुळे एकिकडे जेव्हा धोनीला बीसीसीआयच्या करारामधून वगळल्याची बातमी येऊन धडकली तेव्हा तो क्रिकेटचा सराव करत असल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय संघात पुनरामगन करायचे असेल तर फॉर्म आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी महत्वाचा असतात. धोनीचा फिटनेस तर उत्तम आहेच. पण गेल्या सहा महिन्यांपासून धोनी एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याला फॉर्मात येण्यासाठी आता स्थानिक सामने खेळावे लागणार आहेत.
भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धोनीने आता वेगळीच शक्कल लढवली आहे. सध्याच्या घडीला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत धोनी आता झारखंडकडून उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण धोनी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सराव करतानाचे फोटो चांगलेच वायरल झाले आहेत. धोनीने आजपासून झारखंडच्या संघाबरोबर क्रिकेटचा सराव केला. त्यामुळे झारखंडच्या आगामी रणजी करंडक क्रिकेट सामन्यात धोनी तुम्हाला दिसला तर नवल वाटायला नको.
धोनीचा भारतासाठी अखेरचा सामना खेळून झालाय, हरभजन सिंगचे खळबळजनक विधानभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयने आपल्या वार्षिक करारामधून वगळले आणि त्यानंतर बरीच चर्चा सुरु झाली. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने तर, धोनीचा भारतासाठी अखेरचा सामना खेळून झालाय, असे धक्कादायक विधान केले आहे.
हरभजनने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, " माझ्यामते हा महेंद्रदिंस धोनीच्या कारकिर्दीचा अंत आहे. मी असे ऐकले होते की, क्रिकेट विश्वचषक ही त्याची अखेरची स्पर्धा असेल आणि अखेरचा सामना तो खेळला आहे."
हरभजन सिंग म्हणाला की, " धोनीसाठी आयपीएल ही स्पर्धा फार महत्वाची आहे. कारण आयपीएलमध्ये धोनीने नेत्रदीपक कामगिरी केली तर त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. पण माझ्यामते तरी धोनी आपल्या आंतरराष्ट्रीय करीअरमधील अखेरचा सामना खेळून झाला आहे."