ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. BCCI ने अधिकृत वृत्त दिले नसले तरी PTI ने याबाबतचे वृत्त दिले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी सराव सत्रात जसप्रीतच्या पाठीला दुखापत झाली आणि त्याने या सामन्यातून माघार घेतली. पण, आता हाती आलेल्या बातमीनुसार तो वर्ल्ड कपही खेळणार नाही.
ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यास मैदानावर उतरला आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेला मुकल्यानंतर प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. तीन सामन्यांपैकी दोनच सामने तो खेळला, परंतु काही खास कामगिरी झाली नाही. आता हाती आलेल्या बातमीनुसार त्याच्या पाठीची दुखापत गंभीर आहे, त्यावर शस्त्रक्रियेची गरज नाही, परंतु ४-६ महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.
मोहम्मद शमी व दीपक चहर यांची ट्वेंटी-२० संघात राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. आता या दोघांपैकी एकाची मुख्य संघात निवड होऊ शकते. शमी अजूनही कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याची फिटनेस टेस्ट बीसीसीआय घेणार आहे. दीपक चहरने बऱ्याच दिवसांनी मिळालेल्या संधीचं सोनं करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२०त २ विकेट्स घेतल्या. बुमराहची माघार हा भारताला खूप मोठा धक्का आहे.
आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारताला डेथ ओव्हरमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे बुमराहच्या पुनरागमनामुळे भारताला बळ मिळाले होते. पण, आता रवींद्र जडेजानंतर भारतीय संघाला मोठा धक्का आहे.
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग; राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
- 23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
- 27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
- 30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
- 2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
- 6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
- १३ नोव्हेंबरला अंतिम सामना