कराची : वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी आणि घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सर्फराज अहमदची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाकिस्तानच्या संघामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. निवड समिती अध्यक्ष आणि प्रशिक्षकांनाही बदलण्यात आले आहे. पण तरीही पाकिस्तानची कामगिरी सुधारताना दिसत नाही. त्यामुळे आता अहमदला कसोटी आणि ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला आहे.
पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रशिक्षक मिसबाह उल हक हे संघातील खेळाडूंच्या वागण्यामुळे हैराण झालेले आहेत. पाकिस्तानला श्रीलंकेबरोबरच्या तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर दडपण वाढलेले आहे. पण दुसरीकडे मात्र खेळाडू मिसबाह यांचे काहीच ऐकत नसल्याचेही पुढे आले आहे. त्यादृष्टीनं शुक्रवारी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला.
पाकिस्तानच्या कसोटी संघाचे नेतृत्व अझर अलीकडे सोपवण्यात आले आहे, तर आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक संघ खेळणार आहे. अझर अली म्हणाला,'' पाकिस्तान संघाचे कर्णधारपद मिळणे, हे माझे भाग्यच आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासावर खरा उतरण्याचा माझा प्रयत्न असेल.''