IND vs ENG 5th Test, Rohit Sharma Jasprit Bumrah: भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा हा कोरोनाच्या बाधेमुळे पाचवा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्याला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी अपेक्षेप्रमाणे जसप्रीत बुमराह याला कर्णधारपदाची संधी देण्यात आली आहे. तर रिषभ पंत याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने केली.
बायो बबलचे कवच हटवल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडूंना कोरोनाचा विसर पडलेला दिसला. रोहित शर्मा, विराट कोहलीसह अनेक खेळाडू लंडनच्या रस्त्यांवर भटकंती करताना दिसले. त्याचा फटका टीम इंडियाला बसला अन् कर्णधार रोहितचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना ताकीद दिली, परंतु बर्मिंगहॅम येथे पोहोचल्यानंतर विराट, रिषभ पंत, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आदी खेळाडू एका रेस्टॉरंटमध्ये दिसले. रोहित क्वांरटाईनमधून बाहेर पडला असला तरी तो पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता मावळली. भारतासाठी हा खूप मोठा धक्का आहे.
१ जुलैपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीत रोहित खेळणार नसल्याची चिन्हे आहेत. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत संघाचे नेतृत्व करणार असल्याचे बीसीसीआयने एका वेबसाईटला सांगितले. संघाच्या बैठकीत बुमराहला त्याच्यावरील जबाबदारीची कल्पना देण्यात आली. लोकेश राहुलने दुखापतीमुळे या मालिकेतून आधीच माघार घेतली होती. त्यात रोहितच्या अनुपस्थितीत शुभबन गिलसोबत सलामीला कोण येणार याची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, बुमराह ३५ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटीत कर्णधारपद भूषविणारा कपिल देव यांच्यानंतर पहिलाच जलदगती गोलंदाज ठरणार आहे.