T20 World Cup 2024 : अमेरिका संघाकडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑलराऊंडर इमाद वसीम ( Imad Wasim ) वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता बळावली आहे. या अष्टपैलू खेळाडूला साईड स्ट्रेनमुळे अमेरिकेविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते. BBN स्पोर्ट्स नुसार, वसीमला ९ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताविरुद्धच्या लढतीसाठी तंदुरुस्त करण्यासाठी इंजेक्शन आणि वेदनाशामक औषधे दिली जाऊ शकतात.
अहवालानुसार, भारताविरुद्धच्या लढतीनंतर इमादला मायदेशी परत पाठवण्याची ८०% शक्यता आहे. लाहोरमधील एनसीएमध्ये फिटनेस चाचणी उत्तीर्ण झालेल्या मेहरान मुमताजला स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. मोहम्मद रिझवानसह युवा खेळाडू सईम अयुब हे भारताविरुद्ध डावाची सुरुवात करणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी, बाबर आझम म्हणाला होता, "इमाद पहिला सामना खेळणार नसला तरी, आम्ही आशा करतो की तो उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध असेल."
पाकिस्तान : बाबर आझम (क), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
अमेरिकेविरुद्ध काय घडलं?बाबर आजम ( ४४) , शादाब खान ( ४०) व शाहीन आफ्रिदी ( २३) यांच्या योगदानामुळे पाकिस्तानने १५९ धावा उभ्या केल्या, त्याला अमेरिकेकडून मोनांक पटेल ( ५०), अँड्रीस गौस ( ३५), आरोन जोन्स ( ३६*) आणि नितीश कुमार ( १४*) यांनी सडेतोड उत्तर दिले. नितीशने शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये खेचला. अमेरिकेने त्यात १८ धावा केल्या आणि पाकिस्तानला १ बाद १३ धावाच करता आल्या.