इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाकडून खेळणाऱ्या निकोलस पूरनचा ( Nicholas Pooran) फॉर्म खास झालेला नाही. तरीही त्याला आयपीएल २०२२च्या मधेच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजच्या या डावखुऱ्या आक्रमक फलंदाजाकडे राष्ट्रीय वन डे व ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने ( CWI) मंगळवारी ही घोषणा केली. किरॉन पोलार्डने ( Kieron Pollard) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे विंडीजच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद आता निकोलस पूरनच्या खांद्यावर असणार आहे.
मागील वर्षभरापासून तो विंडीज संघाच्या उप कर्णधारपदी आहे. आता त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्यामुळे आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व २०२३मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत तो संघाला नेतृत्व करेल. शे होप हा संघाचा नवा उप कर्णधार आहे.
पोलार्डच्या अनुपस्थिती पूरनने विंडीज संघाचे नेतृत्व सांभाळताना २०२१मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकली होती. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १ शतक व ८ अर्धशतकं आहेत. ट्वेंटी-२०त त्याने ८ अर्धशतकं झळकावली आहेत. २०१४ सालच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने ६ सामन्यांत ३०३ धावा केल्या होत्या. पूरन म्हणाला,''वेस्ट इंडिज संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याचा मला अभिमान वाटतोय.''
पूरनच्या नेतृत्वाली विंडीजचा संघ ३१ मे पासून नेदरलँड्सविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे.