पाकिस्तान क्रिकेट मंडळाला गुरुवारी मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या तीव्र विरोधानंतर आशियाई क्रिकेट असोसिएशननं त्यांच्याकडून आशिया चषक 2020 स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया चषकाच्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार होती. पण, आता ती स्पर्धा दुबई, बांगलादेश किंवा श्रीलंका यापैकी एका देशात खेळवण्यात येईल.
भारतीय संघानं सुरक्षेचं कारण दाखवताना पाकिस्तानात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेण्याचेही सांगितले होते. अखेर आशियाई क्रिकेट असोसिएशनला ही स्पर्धा पाकिस्तानातून हलवावी लागली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध पाहता, या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह सुरुवातीपासूनच उपस्थित केले जात होते. यंदा आशिया चषक हा ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड कप ट्वेंटी-20 स्पर्धेच्या एक महिना आधी ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आशियाई देशांचा चांगलाच सराव होणार आहे.
यापूर्वी 2016मध्ये आशिया चषक प्रथमच ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता. त्यात भारतीय संघानं बांगलादेशला नमवून जेतेपद पटकावले होते.आशिया चषक वन डे स्पर्धेत भारतानं सर्वाधिक सहावेळा जेतेपद पटकावले आहे. त्यापाठोपाठ श्रीलंका ( 5) आणि पाकिस्तान ( 2) यांचा क्रमांक येतो.