भारतीय संघापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे आणि २ आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यांचा अनुभव असलेल्या जलदगती गोलंदाज गेराल्ड कोएत्झी याला संधी दिली गेली आहे. क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स, हेनरिच क्लासेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन हे अनुभवी खेळाडूही संघात आहेत. दरम्यान, वर्ल्ड कप स्पर्धेनंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock) जाहीर केले.
जबरदस्त झुंज! टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये टक्कर देण्यासाठी जाहीर झाला तगडा संघ
जलदगती गोलंदाजांचे नेतृत्व कागिसो रबाडा करेल आणि त्याच्यासोबतीला एनरिच नॉर्खिया व लुंगी एनगिडी दिसतील. भारतीय खेळपट्टीचा अंदाज घेत दक्षिण आफ्रिकेने केशव महाराज व तब्रेझ शम्सी या दोन अनुभवी फिरकीपटूंना संघात घेतले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत ७ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा सामना करेल. त्याआधी २९ सप्टेंबर व २ ऑक्टोबरला अनुक्रमे अफगाणिस्तान व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध सराव सामना खेळतील.
३० वर्षीय क्विंटन २०१३ पासून आफ्रिकेच्या वन डे संघाचा सदस्य आहे आणि त्याने १४० वन डे सामन्यांत ४४.८५च्या सरासरीने १७ शतकं व २९ अर्धशतकांसह ५९६६ धावा केल्या आहेत. २०२०-२०२१ या कालावधीत त्याने संघाचे नेतृत्वही सांभाळले होते. क्विंटनच्या निवृत्तीबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संचालक एनॉच नॅक्वे यांनी सांगितले,''क्विंटन डी कॉकचे दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी योगदान अतुल्य आहे. त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीचा वेगळाच ठसा उमटवला आहे आणि तो अनेक वर्ष संघाचा प्रमुख खेळाडू आहे. त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत आम्ही समजू शकतो आणि त्याचे आम्ही आभार मानतो, की त्याने इतकी वर्ष देशाची सेवा केली. त्याला भविष्यासाठी शुभेच्छा.''
दक्षिण आफ्रिकेचा संघ - तेम्बा बवुमा ( कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स, मार्के येनसन, हेनरिच क्लासेन, सिसांदा मगाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन