Suryakumar Yadav Injury: टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला आहे. तो किमान ७ आठवडे मैदानापासून दूर राहणार असल्याचे वृत्त आहे. सूर्यकुमारने अलीकडेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघाच्या कर्णधाराची जबाबदारी पार पाडली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची घरच्या मैदानावरील ५ सामन्यांची मालिका भारताने जिंकलेली, तर यजमान दक्षिण आफ्रिकेला १-१ असे बरोबरीत रोखले.
३३ वर्षीय सूर्यकुमारच्या घोट्याला ग्रेड-२ दुखापत झाली आहे. तो किमान ७ आठवडे मैदानाबाहेर राहणार आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर सूर्याच्या घोट्याचे स्कॅनिंग करण्यात आले. जोहान्सबर्गमध्ये या मालिकेतील तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याचा घोटा वळला. जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तंदुरुस्त होईल आणि पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी उपलब्ध असेल.
पण, सूर्यकुमारला अफगाणिस्तानविरुद्ध ११ जानेवारीपासून घरच्या मैदानावर सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घ्यावी लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'सूर्याला बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्याच्या पुनर्वसनासाठी त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) अहवाल द्यावा लागेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो नक्कीच खेळू शकणार नाही.