फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाने ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केले. आयसीसी क्रमवारीत आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला सडेतोड उत्तर देण्यासाठी यजमान विंडीजनंही कंबर कसली आहे. यजमान वेस्ट इंडिजने वन डे मालिकेसाठी शुक्रवारी संघ जाहीर केला. या संघात सलामीवीर ख्रिस गेलला संधी देण्यात आली आहे. शिवाय डावखुरा फलंदाज जॉन कॅम्बेल, रोस्टोन चेस आणि अष्टपैलू खेळाडू किमो पॉल यांचा 14 सदस्यीय संघात समावेश आहे.
टीम इंडियाचा सामना करण्यासाठी विंडीजनं बोलावले 'दोन' हुकुमी एक्के
टीम इंडियाचे नेतृत्व विराटकडेच! धवनचे पुनरागमन, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ जाहीर
3 ऑगस्ट पासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होईल. पहिले दोन सामने फ्लोरिडा येथे खेळवण्यात येतील, तर तिसरा सामना गयाना येथे होईल. त्यानंतर तीन वन डे आणि दोन कसोटी सामनेही होणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेआधी गेलनं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, परंतु त्यानं निर्णय बदलला आणि भारताविरुद्ध मालिका खेळणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गेलला निरोपाच्या मालिकेत विजयाची भेट देण्यासाठी विंडीज संघ उत्सुक आहे.
गेलच्या नावावर 10,338 धावा आहेत आणि विंडीजकडून वन डेत सर्वाधिक 10, 348 धावांचा ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची त्याला संधी आहे. ''ख्रिस गेल हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे अनुभवाची खाण आहे. त्यामुळे त्याचे ड्रेसिंग रुममध्ये असणे अन्य खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे,''असे विंडीजचे मुख्य प्रशिक्षक फ्लॉयड रेफर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,''कॅम्बेल, चेस आणि पॉल यांच्यामुळे संघ संतुलित झाला आहे. सुनील अॅम्ब्रीस, डॅरेन ब्राव्हो, शॅनोन गॅब्रीएल आणि अॅशली नर्स यांना या मालिकेतून मुकावे लागणार आहे. वर्ल्ड कप संघातील सदस्य याही मालिकेत कायम आहेत. 2023च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आतापासूनच आम्ही तयारी करत आहोत.''
असा आहे संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर ( कर्णधार) केमार रोच.