Brendan Taylor Spot Fixing: १९९९ च्या आसपास क्रिकेट विश्वात फिक्सिंगने खळबळ माजवली होती. त्यानंतर ICC आणि सर्वच क्रिकेट बोर्डांनी कठोर भूमिका घेतल्याने फिक्सिंगला आळा घालणं शक्य झालं. पण आता पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंगचं भूत डोकं वर काढताना दिसतंय. झिम्बाब्वेचा क्रिकेटर ब्रँडन टेलरने सोमवारी एक पत्रक जारी केलं. त्यात त्याने अनेक गंभीर आरोप आणि खुलासे केले. ब्रँडन टेलरच्या म्हणण्यानुसार, स्पॉट-फिक्सिंगसाठी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता आणि याचा संबंध एका भारतीय व्यावसायिकाशी असल्याचा दावा त्याने केला आहे. याशिवाय ब्रँडन टेलरलाही बळजबरीने कोकेन देण्यात आले आणि नंतर त्याचा व्हिडिओ बनवून त्याला ब्लॅकमेल करण्यात आल्याचाही खळबळजनक दावा त्याने केला आहे.
ब्रँडन टेलरने पत्रक जारी केल्यानंतर त्याच्यावर तूर्तास ICC ने बंदीची कारवाई केली आहे. लवकरच ICC देखील या प्रकरणात काही खुलासे करण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेकडून २००हून अधिक वन डे सामने खेळलेला ब्रँडन टेलर हा महान खेळाडूंच्या यादीत गणला जातो. 'कसोटीच्या आणि दु:खाच्या काळात साथ दिल्याबद्दल कुटुंबाचे आभार', असं ब्रँडन टेलरने पत्रकात म्हटलं आहे. तसेच, २५ जानेवारीपासून तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये (पुनर्वसन केंद्रात) आपली ड्रग्सची सवय सोडवण्यासाठी जात असून अंमली पदार्थांच्या व्यसनातून बाहेर पडण्याचा आणि बिघडलेल्या जीवनात सुधारणा करून आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याचा त्याचा हा प्रयत्न असल्याचं त्याने म्हटलं आहे.
स्पॉट-फिक्सिंगबद्दल ब्रँडन टेलरचा संपूर्ण खुलासा...
ब्रँडन टेलरने आपल्या खुलाशात सांगितलं की, मी गेली दोन वर्षे मानसिक त्रासात आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मला एका भारतीय व्यावसायिकाने संपर्क केला. त्याने मला स्पॉन्सरशीपबद्दल चर्चा करण्याबाबत विचारलं. मला झिम्बाब्वेमध्ये टी२० लीग सुरू करण्याची योजना सांगण्यात आली आणि भारतात येण्यासाठी १५ हजार डॉलर्स देण्यात आले. हे ऐकून मला विचित्र वाटलं. पण मला झिम्बाब्वे बोर्डाकडून ६ महिन्यांपासून पैसे मिळाले नव्हते आणि क्रिकेट कारकीर्द संपवायची नव्हती. त्यामुळे मी भारतात आलो. तेथे मी त्या व्यावसायिकासोबत डिनर केलं.
कोकेन देऊन केलं ब्लॅकमेल
'ड्रिंक्ससोबत मला कोकेन ड्रग्स ऑफर करण्यात आलं. मी मुर्खासारखं त्यांला बळी पडलो. पण दुसऱ्या दिवशी तोच ड्रग्स सेवनाचा व्हिडीओ दाखवून मला ब्लॅकमेल करण्यात आलं. मी आंतरराष्ट्रीय सामन्यात स्पॉट फिक्सिंग करावं नाहीतर व्हिडिओ व्हायरल करू असं मला धमकावण्यात आलं. आधी दिलेले १५ हजार डॉलर्स अँडव्हान्स असून काम झाल्यावर २० हजार डॉलर्स मिळतील असंही मला सांगितलं गेलं. मला माझा जीव वाचवायचा होता, त्यामुळे मी ते पैसे घेतले', असं त्याने नमूद केलं.
'घरी आल्यानंतर मी आजारी पडलो. भारतीय व्यावसायिकाकडून मी जे पैसे घेतले होते, त्या बदल्यात त्याला फिक्सिंग करून हवं होतं पण त्याला काहीच मिळत नव्हतं. चार महिने त्याचा त्रास सहन केल्यानंतर अखेर मी ICC ला याबद्दल माहिती दिली. परिवाराच्या सुरक्षेसाठी मी आधी ही माहिती दिली नाही असं मी कारण दिलं. पण ICC ला ते मान्य नाही. ICC माझ्यावर खूप वर्षांसाठी बंदी घालण्याच्या तयारीत आहे. मी त्यास तयार आहे', अशी कबुली त्याने दिली आहे.