मुंबई - ठिकाण मुंबईतील क्रिकेटची पंढरी असलेले शिवाजी पार्क. दुपारच्या वेळी सराव करत असलेल्या बाल क्रिकेटपटूंचा खेळ रंगात आला होता. तेवढ्यात तिथे केस आणि दाढी वाढलेला म्हातारबाबा अवतरला. त्याने क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. बच्चेकंपनीला याची गंमत वाटली. त्यांनीही त्या म्हातारबाबाला खेळायला घेतले. हा क्रिकेटपटू दुसरा तिसरा कुणी नव्हे तर आपल्या द्रुतगती गोलंदाजीने जगभरातील फलंजांना धडकी भरवणारा ब्रेट ली होता.
क्रिकेट जगतात बिंगा या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या ब्रेट लीचे भारतीय आणि भारतावरील प्रेम सर्वश्रुत आहे. ब्रेट ली सध्या आयपीएल सामन्यांच्या समालोचनासाठी भारतात आला आहे. त्यादरम्यान त्याने मुंबईत असताना शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळण्याची हौस भागवून घेतली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रात्रीच्या वेळी रस्त्यावर खेळत असलेल्या मुलांसोबत क्रिकेट खेळल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. मात्र ब्रेट लीने थेट मैदानात उतरता वेशांतर करून शिवाजी पार्कची खेळपट्टी गाठली.
दाढी केस वाढलेल्या अवतारात मैदानात उतरलेल्या ब्रेट लीला सुरुवातीला कुणीच ओळखले नाही. मुलांनीही गंमत जंमत म्हणून त्याच्यासोबत खेळण्यास सुरुवात केली. मात्र काही वेळानंतर ब्रेट लीने दोन तीन खणखणीत फटके मारले. मग गोलंदाजी करताना युवा क्रिकेटपटूंची दांडीही गुल केली. तेव्हा मात्र हा म्हातारबाबा एवढा चांगला कसा काय खेळू शकतो असा प्रश्न बच्चे कंपनीला पडला. मग ब्रेट लीनेही आपली खरी ओळख त्यांना दाखवली. त्यानंतर मात्र ब्रेट लीजवळ स्वाक्षरी घेण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी बच्चे कंपनीची झुंबड उडाली. त्यानेही या क्षणांचा मनमुराद आनंद लुटला.
Web Title: brett lee play cricket in Shivaji Park
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.