मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दहा अव्वल संघ सर्वस्व पणाला लावणार आहेत. इंग्लंडच्या पाटा खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळणार आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीनं 30 मेपासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण, या वर्ल्ड कपमध्ये कोणाच्या बॅटीतून धावांची आतषबाजी होईल? कोण ठरले स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू?
या प्रश्नांची उत्तर शोधताना विराट कोहली, रोहित शर्मा, ख्रिस गेल, फॅफ ड्यू प्लेसिस, जो रूट, केन विलियम्सन, जसप्रीत बुमराह, रशीद खान, कागिसो रबाडा, स्टीव्ह स्मिथ आणि अनेक खेळाडूंची नावं चर्चेत आहेत. पण, ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेट ली याच्या मते डेव्हिड वॉर्नर या सर्वांत भाव खावून जाईल. स्पर्धाशेवटी सर्वोत्तम खेळाडूच मान हा वॉर्नरचा असेल, अशी भविष्यवाणी ब्रेट लीने केली आहे. तो म्हणाला,''तो धावांचा भुकेला आहे. त्याची फलंदाजी पाहण्यासारखी असेल,''असे ली म्हणाला.
चेंडु कुरतडण्याप्रकरणी एका वर्षांच्या बंदीनंतर मैदानावर परतलेल्या वॉर्नरने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार फलंदाजी केली. सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने आयपीएलच्या 12व्या मोसमात सर्वाधिक 692 धावा चोपल्या. ली म्हणाला,''त्याच्या फटकेबाजीवर मला धावांचा भुकेला, असाच शब्द योग्य वाटतो. त्याच्या नजरेतून ती भूक दिसते. त्याने स्वतःहून विकेट फेकलेली नाही किंवा चुकीचा फटकाही मारलेला नाही. तो सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर प्रहार करतो.''