नवी दिल्ली : आयपीएल २०२२ चे पर्व सुरू होण्याआधी सनरायजर्स हैदराबादने धमाका केला. माजी दिग्गजांना सपोर्टिंग स्टाफशी जोडण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा यांची रणनीती सल्लागार आणि फलंदाजी कोच म्हणून, तर वेगवान गोलंदाज कोच म्हणून द. आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याची नियुक्ती केली.
टॉम मूडी हे संघाचे मुख्य कोच असतील. फिरकी गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदाची धुरा श्रीलंकेचा माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरनकडे कायम असून क्षेत्ररक्षक कोचपदाची जबाबदारी हेमांग बदानीकडे सोपविण्यात आली आहे. आरसीबीचे मुख्य कोच राहिलेले सायमन कॅटिच हे हैदराबादचे सहायक प्रशिक्षक असतील. सनरायजर्सने सोशल मीडियाद्वारे ही घोषणा केली. २०२१ च्या आयपीएलमध्ये हैदराबाद संघ केन विलियम्सनच्या नेतृत्वात १४ पैकी केवळ तीन सामने जिंकला.
लारा प्रथमच आयपीएलमध्ये
२००७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारे ब्रायन लारा प्रथमच आयपीएलमध्ये एखाद्या संघासोबत फलंदाजी कोच म्हणून दिसणार आहेत. केवळ आयपीएल नव्हे तर कारकीर्दीतही ते पहिल्यांदा एखाद्या संघाला कोचिंग देतील. त्यांनी १३१ कसोटींत ११९५३ आणि २९९ वन डेत १०४०५ धावा केल्या आहेत. स्टेन देखील प्रथमच आयपीएलमध्ये कोचच्या भूमिकेत असेल. याआधी त्याने सनरायजर्स हैदराबादकडून ३७ सामने खेळले आहेत. मुरलीधरन आणि मूडी हे आधीपासूनच संघासोबत जुळलेले आहेत. मूडी हे मागच्या पर्वात संघाचे संचालक होते. ऑस्ट्रेलियाचे ट्रॅव्हर बेलिस यांनी २०२१ च्या पर्वानंतर मुख्य कोचपद सोडले.
तीन खेळाडूंना केले रिटेन
हैदराबाद संघाने मेगा ऑक्शनपूर्वी केवळ तीन खेळाडूंना रिटेन केले. त्यापैकी संघाचा कर्णधार केन विलियम्सन याला १४ कोटी रुपये दिले. अब्दुल समद आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी ४-४ कोटी रुपयांत संघात घेतले. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशीद खान याला रिटेन न करण्याचा फ्रॅन्चायजीचा निर्णय अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. राशीद हा संघासाठी मॅचविनर खेळाडू असल्याने लिलावात त्याला खरेदी करण्यात अपयश आल्यास हैदराबादची ही मोठी चूक ठरू शकते.
Web Title: brian lara becomes sunrisers batting coach dale steyn and muralitharan bowling coach
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.