क्रिकेटच्या इतिहासाकडे जेव्हा-जेव्हा मागे वळून पाहिले जाईल तेव्हा तेव्हा सचिन तेंडुलकरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीने सर्वच क्रिकेट प्रेमींना अक्षरशः भुरळ घातली होती. आज शेकडो क्रिकेटपटू असे आहेत, जे सचिनला बघतच मोठे झाले आहेत. मात्र, सचिन तेंडुलकरचा चांगला मित्र आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याने एक मोठा दावा केला आहे. आपल्या काळात एक असा खेळाडू होता, जो सचिन तेंडुलकर आणि माझ्यापेक्षाही चांगला होता, असे लाराने म्हटले आहे.
ब्रायन लाराने त्याचे पुस्तक 'लारा : द इंग्लंड क्रोनिकल्स' मध्ये सचिन तेंडुलकर आणि त्याच्या पेक्षाही चांगला खेळाडू कोण होता? हे सांगितले आहे. लाराने कार्ल हूपरचे नाव घेतले आहे. महान ऑलराउंडर कार्ल हूपरने वेस्टइंडीजसाठी 102 टेस्ट आणि 227 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 5762 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याच्या नावावर 5761 धावा आहेत. एवढेच नाही तर, त्याने टेस्टमध्ये 114 तर वनडेमध्ये 193 विकेट घेतल्या आहेत.
कार्लने आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर केला असता तर तो तेंडुलकरपेक्षा चांगला फलंदाज ठरला असता, असे लाराचे म्हणणे होते. लाराने आपल्या पुस्तकात लिहिले म्हटले आहे, "कार्ल हूपर हा निश्चितपणे मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता. मी म्हणेन की, तेंडुलकर आणि मी देखील त्या प्रतिभेच्या जवळ पोहोचू शकत नाही." याशिवाय ब्रायन लाराने, कूपर वेस्ट इंडिजचा कर्णधार असतानाच्या वेळेवरही प्रकाश टाकला.
लारा पुढे म्हणतो, "कार्ल हूपरचे करिअर खेळण्यापासून ते कर्णधारपदापर्यंत वेगळे केले, त्याचे आकडे प्रचंड वेगळे आहेत. कर्णधार म्हणून त्याची सरासरी 50 च्या जवळपास होती. यामुळे त्यांना जबाबदारीचा आनंद मिळाला. पण त्याने करर्णधार म्हणूनच आपली खरी क्षमता पूर्ण केली, हे दु:खद आहे." कार्ल हूपरने 1987 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केले होते आणि 2003 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामनाखेळला. तर सचिन 1989 ते 2013 पर्यंत खेळला.