नवी दिल्ली : कारकिर्दीच्या सुरुवातीला संघात निवडीसाठी निवडकर्त्यांनी लाच मागितल्याच्या घटनेला उजाळा देत भारतीय कर्णधार विराट कोहली याने सनसनाटी निर्माण केली आहे. विराटने अलीकडे भारतीय फुटबॉल संघातील दिग्गज खेळाडू सुनील छेत्री याच्यासोबतच्या मुलाखतीत या घटनेला उजाळा दिला. ‘माझे वडील प्रेम यांनी दिल्ली संघात निवड होण्यासाठी लाच देण्यास स्पष्ट नकार दिला होता,’ असे कोहलीने सांगितले. (वृत्तसंस्था)
गुणवत्तेच्या आधारे मुलाला खेळवा३१ वर्षांचा कोहली म्हणाला, ‘मी खेळाडू निवडीच्या निकषात फिट बसत नव्हतो. त्यामुळे निवडकर्त्यांनी वडिलांशी संपर्क साधून संघात निवडीसाठी लाचेची मागणी केली. विराटच्या वडिलांनी स्पष्ट नकार देत माझा मुलगा केवळ गुणवत्तेच्या आधारे संघात खेळावा, अशी भूमिका घेतली होती.’
संघात स्थान टिकविण्यासाठीही लाच मागितलीविराट पुढे म्हणाला, ‘माझे गृहराज्य असलेल्या दिल्लीत अशा घटना वारंवार घडतात, पण त्या योग्य नाहीत. निवडीसाठी नियम धाब्यावर बसवले जातात. निवडकर्त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की तुमच्या मुलात क्षमता आहे, मात्र लाच दिली तर तो नियमित संघात खेळत राहील.’ माझे वडील प्रामाणिक मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधी होते. ते मेहनतीच्या बळावर लोकप्रिय वकील बनले. माझ्या मुलाची निवड त्याच्या मेहनतीच्या बळावरच करा, असे त्यांनी निवडकर्त्यांना खडसावले होते.