IPL 2024 Auction (Marathi News) : पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सला २०२२ मध्ये जेतेपद जिंकून दिल्यानंतर २०२३ मध्ये फायनलपर्यंत घेऊन गेला होता. त्यानंतर आयपीएल २०२४ पूर्वी त्याने मुंबई इंडियन्सकडे परतण्याचा निर्णय घेतला. हार्दिकसाठी फ्रँचायझीनेही कॅमेरून ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत ट्रेड केले. हार्दिक आल्याचा चाहत्यांना आनंद होताच, परंतु त्याला थेट कर्णधारपद दिल्याने नाराजीचा सूर उमटू लागला. ही नाराजी काल दुबईत पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेतही दिसली.
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० अशी पाच जेतेपदं पटकावली. त्याने आयपीएलमध्ये १५८ सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी ८७ सामने जिंकले. ६७ सामन्यांत मुंबईची हार झाली, तर ४ सामने टाय राहिले. रोहितने आयपीएलमध्ये एकूण २४३ सामन्यांत २९.५८च्या सरासरीने ६२११ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ५५४ चौकार व २५७ षटकार खेचले आहेत. यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये प्रथमच प्रेक्षकांना परवानगी दिली गेली होती.
यावेळी मुंबई इंडियन्सच्या टेबलवर मालक आकाश अंबानी व निता अंबानी उपस्थित होते. यावेळी प्रेक्षकांमधून एक जण ओरडले, की रोहित शर्मा को वापस लाओ ( रोहित शर्माला कर्णधारपदी परत आणा). यावर आकाश अंबानी यांनी सहा शब्दात उत्तर दिले. ते म्हणजे, चिंता करू नका, तो फलंदाजी करेल.
मुंबई इंडियन्सने IPL 2024 Auction मध्ये खरेदी केलेले खेळाडू - गेराल्ड कोएत्झी ( ५ कोटी), नुवान तुषारा ( ४.८० कोटी), दिलशान मदुशंका ( ४.६० कोटी), मोहम्मद नबी ( १.५० कोटी), श्रेयस गोपाल ( २० लाख), शिवालिक शर्मा ( २० लाख), अंशुल कम्बोज ( २० लाख), नमन धीर ( २० लाख)