नवी दिल्ली - केंद्र शासनाने गुरुवारी सादर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये क्रीडा मंत्रालयासाठी ३,४४२.३२ कोटींची तरतूद केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत ४५.३६ कोटी इतकी वाढ केली आहे. मागच्या वर्षी खेळांसाठी ३,३९६.९६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. २०२४-२५ या आर्थिक वर्षादरम्यान मुख्य लक्ष्य पॅरिस येथे २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत आयोजित ऑलिम्पिकवर असेल.
खेलो इंडियाच्या मागच्या बजेटमध्ये २० कोटींची वाढ करून एकूण ९०० कोटींची तरतूद करण्यात आली. राष्ट्रीय शिबिरे, पायाभूत सुविधा, क्रीडा उपकरणे आणि कोचेसच्या नियुक्तींसह अन्य कामांसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या बजेटमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २६.८३ कोटींची वाढ करीत ७९५.७७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीला (नाडा) २२.३० कोटी देण्यात येणार आहेत. २०२३ ला २१. ७३ कोटींची तरतूद होती. राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एनएसएफ) २०२३-२४ ला ३२५ कोटींची तरतूद होती. त्यात १५ कोटींची भर पडली आहे. राष्ट्रीय डोप तपास प्रयोगशाळेला(एनडीटीएल) २२ कोटी, राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्राला ९१.९० कोटी, खेळाडू भत्त्यांसाठी ८४.३९ कोटी, राष्ट्रीय क्रीडा विकास कोषासाठी १८ कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली.
सीतारामन यांनी केला प्रज्ञाननंदाचा उल्लेखनिर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान भारताचा युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञाननंदा याचा उल्लेख केला. यावेळी सीतारामन यांनी सांगितले की, प्रज्ञाननंदाने सध्याचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन याला कडवी झुंज दिली. त्याची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद आहे. भारतात आता ८० बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत. २०१० मध्ये केवळ २० ग्रँडमास्टर होते. त्यांनी क्रीडा क्षेत्रातील भारताच्या अद्भुत कामगिरीचे वर्णन केले. गेल्या वर्षी आशियाई स्पर्धा आणि आशियाई पॅरा स्पर्धांमध्ये भारताने आतापर्यंत सर्वोच्च कामगिरी केली. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावल्याचे दिसते.