किंग्जस्टन : हनुमा विहारीच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसºया दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव ४७.१ षटकात ११७ धावांत गुंडाळला. यासह भारताने तब्बल २९९ धावांची भलीमोठी आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. विशेष म्हणजे यानंतरही भारताने यजमानांवर फॉलोआॅन लादण्याचा निर्णय घेतला नाही.
बुमराहने २७ धावांत ६ गडी बाद करीत वेस्ट इंडीजचे पहिले पाच फलंदाज तंबूत धाडले. यात त्याने हॅट्ट्रिकही नोंदवली. कसोटीत हॅट्ट्रिक नोंदवणारा बुमराह हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांच्यानंतरचा तिसरा भारतीय गोलंदाज बनला. शनिवारी बुमराहच्या भेदकतेला यजमान संघाच्या फलंदाजांकडे उत्तरच नव्हते. याशिवाय मोहम्मद शमीनेही २ बळी घेत बुमराहला चांगली साथ दिली. तसेच इशांत शर्मा व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. बुमराहने सातव्या षटकांत विकेट घेण्याची मालिका सुरू केली. सर्वात आधी त्याने जॉन कॅम्पबेलला बाद केले. त्याचा झेल ऋषभ पंतने लीलया घेतला. त्यानंतर नवव्या षटकात बुमराहने सलग चेंडूंत डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रुक्स आणि रॉस्टन चेज यांना तंबूत धाडत आपला दबदबा निर्माण केला. ब्राव्होचा झेल दुसºया स्लीपमध्ये उभ्या असणाºया लोकेश राहुलने घेतला आणि पुन्हा पुढील दोन चेंडूंवर ब्रुक्स व चेज यांना पायचीत केले.
बुमराहच्या हॅट्ट्रिकचे श्रेय कर्णधार विराट कोहलीलाही जाते. चेजला मैदानी पंच पॉल रॅफेल यांनी नाबाद ठरवले. त्यानंतर विराटने रिव्ह्यू घेतला व तो यशस्वी ठरला. बुमराहने क्रेग ब्रेथवेट (१०) याच्या रूपाने पाचवा बळी घेतला. त्यानंतर शिमरोन हेटमायर (३४) याला मोहंमद शमीने तंबूत धाडले व नंतर पुन्हा बुमराहने वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याला बाद करीत सहावा गडी मिळवला. शमीने यानंतर रखीम कॉर्नवॉलल बाद केले. पहिल्या डावातील अर्धशतकवीर इशांत शर्माने जहमार हॅमिल्टन (५) आणि रवींद्र जडेजाने केमार रोच (१७) याला बाद करुन विंडीजचा डाव संपुष्टात आणला. विंडीजकडून हेटमायरची ३४ धावांची खेळी सर्वोत्तम ठरली. त्याने ५७ चेंडूत ७ चौकार मारले. त्याआधी हनुमा विहारीच्या १११ धावा आणि इशांत शर्माच्या ५७ धावांच्या बळावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावा केल्या. या दोघांनी आठव्या गड्यासाठी ११२ धावांची भागीदारी केली. विहारीने २२५ चेंडूत १६ चौकारांसह आपली खेळी सजवली.
कर्णधार कोहली (७६) अर्धशतक झळकावल्यानंतर बाद झाल्यानंतर रिषभ पंत (२७) दिवसातील पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर रवींद्र जडेजाही (१६) फारशी चमक न दाखवता बाद झाला. मात्र कारकिर्दीत पहिल्यांदा अर्धशतकी खेळी करत लक्ष वेधलेल्या इशांतने ८० चेंडूत ७ खणखणीत चौकारांसह ५७ धावांचा महत्त्वपूर्ण दणका दिला. त्याने सुरुवातीला अत्यंत सावध पवित्रा घेत खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर एका कसलेल्या फलंदाजाप्रमाणे फटकेबाजी करत सर्वांनाच चकीत केले. इशांत आणि हनुमा यांच्यामुळे भारताला चारशेचा पल्ला पार करण्यात यश आले. कर्णधार जेसन होल्डरने ७७ धावांत अर्धा संघ बाद करत चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक(पहिला डाव) : भारत : १४०.१ षटकात सर्वबाद ४१६ धावा (हनुमा विहारी १११, विराट कोहली ७६, इशांत शर्मा ५७, मयांक अग्रवाल ५५; जेसन होल्डर ५/७७, रखीम कॉर्नवॉल ३/१०५.)वेस्ट इंडिज : ४७.१ षटकात सर्वबाद ११७ धावा (शिमरॉन हेटमायर ३४; जसप्रीत बुमराह ६/२७, मोहम्मद शमी २/३४.)