इंदूर - भारताकडून सणसणीत पराभवाला सामोरे गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कप्तानाने, स्टीव्ह स्मिथने जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमारवर स्तुतीसुमने उधळली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला. त्यानंतर या सामन्याबद्दल बोलताना स्मिथनं बुमराह व भुवनेश्वर हे सर्वोत्कृष्ट डेथ बोलर्स आहेत असं कौतुक केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज अरॉन फिंचनं 124 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला 38 षटकांमध्ये 2 बाद 242 धावा अशा भक्कम स्थितीत आणले. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डाव संपला त्यावेळी 6 गडी गमावत अवघ्या 293 धावा केल्या. त्यानंतर भारताने 3 - 0 अशी ही मालिका खिशात टाकताना तिसरा सामना आरामात जिंकला.
"चुकीच्या बॉलवर चुकीचा फटका खेळायची चूक आम्हाला महागात पडली. अर्थात, भारताची गोलंदाजीही चांगली झाली. मला वाटतं, शेवटच्या महत्त्वाच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणारे बुमराह व भुवनेश्वर कुमार सध्याचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहेत. विशेषत: विकेट जर मंदावत असेल तर या दोघांना खेळणं अवघड असतं," असे उद्गार स्मिथने काढले आहेत.
आम्हाला या परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल असे सांगताना स्मिथ म्हणाला की पहिल्या 38 षटकांमध्ये आम्ही उत्कृष्ट खेळ केला परंतु नंतर त्याचा फायदा उठवू शकलो नाही. आक्रमक क्रिकेट खेळायची संधी असूनही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना तसं खेळायची संधी न देता बुमराह व भुवनेश्वरने जखडून ठेवलं अशी कबुली स्मिथनं दिली आहे. जिंकायच्या जवळ पोचायचं परंतु शेवटी सामना हरायचा हे आमच्याबाबतीत सारखं घडत असल्याची खंत स्मिथनं व्यक्त केली.
अशा प्रकारे पराभव स्वीकारल्यानंतर खचलेल्या संघामध्ये चैतन्य आणणं कठीण असल्याची भावनाही स्मिथनं व्यक्त केली आहे. विशेषत: 3 - 0 असा पराभव झाल्यानंतर परिस्थिती बिकट असते असं तो म्हणाला. आम्हाला जिंकण्याची सवय लावून घ्यावीच लागेल असं सांगताना स्मिथनं गेल्या 15 सामन्यांपैकी 13 हरल्याचे व 2 सामन्यांचा निकाल न लागल्याचे सांगितले.