जसप्रीत बुमराहनं शुक्रवारी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर खास विक्रमाला गवसणी घातली. फिरकीसाठी नंदनवन असलेल्या चेपॉकच्या मैदानात भारताच्या ताफ्यातील जलगती गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० विकेट्सचा टप्पा पार केला. ज्या बांगलादेशच्या गोलंदाजाने भारतीय संघाविरुद्ध पंजा मारला त्या हसन महमूदला आउट करत बुमराहनं ४०० चा टप्पा गाठला.
बुमराहनं घातली खास विक्रमाला गवसणी
चेन्नईच्या मैदानातील कसोटी सामन्यात बांगलादेशच्या पहिल्या डावातील पहिल्या षटकातच बुमराहानं पहिली विकेट घेतली होती. एका अप्रतिम चेंडूवर त्याने शादाम इस्लाम याला क्लीन बोल्ड करत या कसोटी सामन्यात आपल्या विकेटच खातं उघडलं. त्यानंतर मुशिफिकूर रहिमला त्याने लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. विराट कोहलीच्या कॅचच्या मदतीने बुमराहनं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तिसरी विकेट्स मिळवली. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ४०० विकेट्सचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा सहावा जलदगती गोलंदाज आहे.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात बुमराह टीम इंडियाचे प्रमुख अस्त्र
जसप्रीत बुमराहनं २०१६ मध्ये वनडे क्रिकेटमधून टीम इंडियात पदार्पण केले होते. वनडेसह तो टी-२० आणि कसोटी संघाचा प्रमुख भाग आहे. वनडेत त्याच्या खात्यात १४९ विकेट्स जमा आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ८९ बळी टिपले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी त्याच्या खात्यात कसोटीत १५९ विकेट्सची नोंद होती. चेन्नईतील तिघांना तंबूचा रस्ता दाखवत त्याने ४०० विकेट्सचा टप्पा गाठला.
भारताकडून ४०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारे जलदगती गोलंदाज
कपिल देव - ३७३ डावात ६८७ विकेट्स
झहीर खान- ३७३ डावात ५९७ विकेट्स
जवागल श्रीनाथ- ३४८ डावात ५५१ विकेट्स
मोहम्मद शमी- २४५ डावात ४४८ विकेट्स
इशांत शर्मा- २८० डावात ४३४ विकेट्स
जसप्रीत बुमराह- २२७ डावात ४०० विकेट्स
Web Title: Bumrah becomes sixth Indian pacer to pick 400 international wickets during IND vs BAN Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.