दुबई : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेचा लसिथ मलिंगा याची उणीव भरून काढली असून चारवेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या माऱ्याचे तो नेतृत्व करतो, असे मत अष्टपैलू किरोन पोलार्ड याने व्यक्त केले आहे.
बुमराहने २४ धावात तीन गडी बाद केल्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये केवळ पाच धावा दिल्या होत्या. बुमराहची कामगिरी संघासाठी मात्र उपयुक्त ठरू शकली नाही. दुसºया सुपर ओव्हरमध्ये पंजाबने हा थरार जिंकला. पोलार्ड म्हणाला, ‘बुमराह विश्वदर्जाचा गोलंदाज असून प्रत्येक प्रकारात नंबर वन आहे. त्याने अनेक गोष्टी शिकल्या. काही वर्षांपूर्वी आमच्यासोबत लसिथ मलिंगा होता. आता बुमराहने त्याची जागा घेतली.’ आयपीएलचा सर्वांत यशस्वी गोलंदाज मलिंगाने यंदा वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे.
पराभवाबाबत पोलार्ड म्हणाला, ‘आम्ही सामना गमावला पण चांगला खेळ केला. हा अनेकांनी घेतलेला निर्णय होता. यातून नवे काही शिकता
येईल.’दुसरा सुपर ओव्हर टाकणारा पंजाबचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन म्हणाला, ‘माझ्या मते यंदा आम्ही जे सामने खेळलो त्यात विजय मिळवू शकलो असतो. मागच्या दोन सामन्यात सांघिकता आणि एकजुटीच्या बळावर विजय साजरे केले. या विजयाचा आनंद आहे, मात्र संतुष्ट नाही. यापुढील सामन्यातही विजयी लय कायम राखून अन्य संघांसोबत चढाओढ करायची आहे.’