नवी दिल्ली : दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेला मुकलेले भारतीय संघाचे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत. नुकतेच या दोघांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झालेली तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण केली, त्यामुळे आता ते भारतीय संघात खेळण्यासाठी उपलब्ध असतील.
एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड १५ सप्टेंबरला होण्याची दाट शक्यता आहे. तसेच हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह या दोन वेगवान गोलंदाजांनी तंदुरुस्ती चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्याने त्यांचा सहभाग जवळपास निश्चित मानला जातो आहे. मात्र, या दोघांच्या पुनरागमनामुळे आवेश खानला संघाबाहेर बसावे लागू शकते. आशिया चषकात आवेशला गोलंदाजीत विशेष छाप पाडता आली नव्हती. पाठीच्या दुखण्यामुळे जसप्रीत बुमराह जुलै महिन्यापासून संघाबाहेर आहे. तसेच मांशपेशी ताणल्या गेल्यामुळे हर्षल पटेललाही आशिया चषकात खेळता आले नव्हते. यानंतर दोघांनाही बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत ठेवण्यात आले . तिथे बीसीसीआयची डॉक्टरांची चमू त्यांच्या फिटनेसवर बारीक लक्ष ठेवून होती.
मोहम्मद शमीही परतणार
आश्चर्यकारकरीत्या आशिया चषकाच्या संघातून वगळण्यात आलेला मोहम्मद शमी याची टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्ट्यांवर शमी भारताचा हुकमी एक्का ठरू शकतो. शमी, बूमराह आणि भुवनेश्वर हे भारताचे वेगवान त्रिकूट विश्वचषकात प्रभावी ठरेल.
कोण होणार संघाबाहेर
बुमराह आणि पटेल यांच्या पुनरागमनानंतर एक वेगवान आणि एक फिरकी गोलंदाजाला संघाबाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. आशिया चषकात भारताकडे आर. अश्विन, युझवेंद्र चहल रवी बिष्णोई आणि अक्षर पटेल या चार फिरकीपटूंचा समावेश होता. त्यामुळे अनुभवाच्या आधारावर बिष्णोईला संघाबाहेर जावे लागू शकते.
अक्षर पटेल आणि दीपक हुडा यांच्यात चुरस
गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजाची जागा घेण्यासाठी दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांच्यात चुरस पाहायला मिळू शकते. जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो विश्वचषकात खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्याच्यासारखाच खेळ असलेल्या अक्षर पटेलला संघात स्थान मिळू शकते; पण बॅटिंग ऑलराऊंडरचा विचार जर निवड समितीने केला, तर हुडाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
Web Title: Bumrah, Harshal Patel set for comeback; Team selection for T20 World Cup on September 15
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.