विशाखापट्टणम : जसप्रीत बुमराहने टीकाकारांचे लक्ष्य ठरलेला गोलंदाज उमेश यादवची पाठराखण करताना, ‘एखाद्या दिवशी अंतिम षटकातील गोलंदाजीची रणनीती अपयशी ठरते,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात अखेरच्या षटकात उमेशला १४ धावांचा बचाव करता आला नाही. बुमराहने १९ व्या षटकात शानदार गोलंदाजी करताना केवळ दोन धावा दिल्या आणि भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यामुळे उमेशला अखेरच्या षटकात १४ धावांचा बचाव करीत आॅस्ट्रेलियाला १२७ धावांच्या लक्ष्यापासून रोखायचे होते.
उमेशच्या शेवटच्या षटकाबाबत विचारल्यानंतर बुमराहने आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याचा बचाव करताना सांगितले की, ‘असे घडते, कुठल्याही स्थितीत अंतिम षटकात गोलंदाजी करणे नेहमीच कठीण असते. सामन्याचे पारडे दोन्ही बाजूला
झुकू शकते. अनेकदा यात दोन्ही संघांना समान संधी असते. तुम्ही सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करता. तुमची रणनीती स्पष्ट असते. कधी
ती यशस्वी ठरते तर कधी त्यात अपयश येते. यात चिंता करण्याची गरज नाही. आम्ही सामना जिंकण्यास इच्छुक होतो, पण त्यात यश आले नाही.’
जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला, ‘नाणेफेक जिंकल्यामुळे काय करायचे आहे, याची आॅस्ट्रेलिया संघाला माहिती होती. त्यांच्यापुढे लक्ष्य होते, तर भारतीय संघ आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील होता. लक्ष्य जर माहीत असेल तर वेगळे असते. लक्ष्य छोटे असल्यामुळे एक चौकार लगावल्यानंतर धोका पत्करण्याची गरज नव्हती. पण, प्रथम फलंदाजी करताना आम्ही आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील होतो. त्यामुळे ते थोडे वेगळे होते. आॅस्टेÑलियन फलंदाज चौकार मारल्यानंतर स्ट्राईक रोटेट करीत होते.’ (वृत्तसंस्था)
खेळपट्टी सर्वांसाठीच खडतर होती - मॅक्सवेल
आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीवर संथ स्ट्राईक रेटबाबत टीका होत आहे, पण ग्लेन मॅक्सवेलच्या मते या संथ खेळपट्टी माजी भारतीय कर्णधाराला यापेक्षा अधिक काही करता आले नसते.
धोनीने ३७ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर येत नव्हता. दुसऱ्या टोकाकडून फलंदाज बाद झाले. शेवटी धोनी युझवेंद्र चहलसह खेळपट्टीवर होता. मॅक्सवेलने धोनीचा बचाव करताना सांगितले की,‘त्याची खेळी योग्यच होती. खेळपट्टीचे स्वरूप बघता कुठल्याही फलंदाजासाठी धावा फटकावणे कठीण होते. चहलसारख्या खेळाडूच्या साथीने फलंदाजी करताना धोनीची खेळी परिस्थितीनुरुप होती. ’या खेळपट्टीवर चेंडू खाली राहात होता.
धोनीला आपल्या खेळीत केवळ एकच षटकार लगावता आला. मॅक्सवेल म्हणाला,‘धोनी एक जागतिक दर्जाचा फिनिशर आहे. या खेळपट्टीवर आक्रमक फलंदाजी करणे कठीण होते. त्यामुळे स्ट्राईक रोटेट करण्याची त्याची रणनीती योग्यच होती. त्याने अखेरच्या षटकात एक षटकार लगावला. त्यावरून तेथे फलंदाजी करणे किती कठीण होते, याची कल्पना येते.’
...तर विश्वकप संघात स्थान मिळू शकते
च्‘मिळालेल्या संधीचा असाच लाभ घेतला तर विश्वकप संघात स्थान मिळू शकते,’ अशी प्रतिक्रिया मॅक्सवेलने व्यक्त केली. विश्वकप संघात स्थान मिळेलच, याबाबत मॅक्सवेल अद्याप निश्चिंत नाही. भारताविरुद्ध पहिल्या टी-२० लढतीत केलेली खेळी संघात स्थान मिळवून देण्यासाठी सहायक ठरू शकते, असे मॅक्सवेलला वाटते.
च्भारताविरुद्ध पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात मॅक्सवेलची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली. त्याने ४३ चेंडूंना सामोरे जाताना ५६ धावा केल्या. मॅक्सवेल म्हणाला,‘विश्वचषक संघात स्थान मिळेलच किंवा मी कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करणार, याची मला कल्पना नाही. मिळालेल्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. मी कामगिरीत सातत्य राखले तर मला विश्वकप संघात स्थान मिळू शकते. त्यासाठी कामगिरीत सातत्य राखावे लागले. वर्षभर अशाच प्रकारे फलंदाजी करण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे.’
Web Title: Bumrah has done Umesh's cage
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.