मुंबई : ‘भारताविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका महत्त्वपूर्ण असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला घाबरण्याची गरज नाही,’असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच याने सहकारी खेळाडूंना दिला. आपला संघ भारताविरुद्ध सज्ज असल्याचे तो म्हणाला. या मालिकेत बुमराहविरुद्ध आॅस्ट्रेलियाचे फलंदाज अशी लढत पाहण्यासारखी असणार आहे.फिंचने बुमराहला घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले. ‘माझ्यामते तुम्ही जितकी अधिक बुमराहची गोलंदाजी खेळाल, तशी तुम्हाला सवय होईल. अधिकाधिक सरावामुळेच तुम्हाला त्याच्या गोलंदाजीतले बारकावे कळून येतील. त्यामुळे बुमराहला घाबरण्याची गरज नाही, असे माझे मत आहे,’ असे फिंचने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ‘बुमराह हा निर्विवादपणे जगातला सर्वोत्तम गोलंदाज आहे, पण ज्यावेळी तुम्ही त्याच्याविरुद्ध खेळत नसाल,त्यावेळी त्याला गोलंदाजी करताना पाहणे खूप बरे वाटते. त्याच्याकडे गती आहे आणि माराही अचूक टप्प्यावर असतो. बुमराहविषयी विचार करत बसण्यापेक्षा आम्हाला आमच्या फलंदाजीकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. प्रत्येक खेळाडूची काही बलस्थाने असतात तर काही उणीवा असतात. जे काही आव्हान असेल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’ या शब्दात फिंचने संघाच्या तयारीविषयी मत मांडले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- बुमराहला घाबरण्याची गरज नाही, फिंचचा सहकाऱ्यांना सल्ला
बुमराहला घाबरण्याची गरज नाही, फिंचचा सहकाऱ्यांना सल्ला
‘भारताविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका महत्त्वपूर्ण असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला घाबरण्याची गरज नाही,’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 3:22 AM