दुबई : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याच वेळी फलंदाजांमध्ये इंग्लंडच्या हॅरी ब्रूक याने एका स्थानाने प्रगती करत इंग्लंडच्याच जो रुटला मागे खेचत अव्वल स्थान काबीज केली. अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजाचे वर्चस्व कायम आहे.
भारताविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीत दमदार शतक ठोकणारा ट्रॅविस हेड याने सहा स्थानांची झेप घेत, पाचवा क्रमांक मिळवला आहे. भारताचा यशस्वी जैस्वाल चौथ्या स्थानावर कायम आहे. ऋषभ पंतला तीन स्थानांचा फटका बसला असून तो नवव्या स्थानी घसरला आहे.
अष्टपैलूमध्ये जडेजा अव्वल
अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजा अव्वल स्थानी कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत संधी न मिळाल्यानंतरही त्याचे अव्वल स्थान कायम आहे. बांगलादेशच्या मेहिदी हसनने दुसरे स्थान पटकावले असून, तो जडेजाच्या तुलनेत तब्बल १३१ गुणांनी मागे आहे. रविचंद्रन अश्विनने तिसरे स्थान कायम राखले आहे.
शुभमन गिलने एका स्थानाने प्रगती करत १७वे स्थान पटकावले. विराट कोहलीची सहा स्थानांनी २०व्या स्थानी घसरण झाली. गोलंदाजांमध्ये बुमराहने आपले अव्वल स्थान भक्कम केले आहे. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा असून, दोघांमध्ये ३४ गुणांचे अंतर आहे. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावलेला कर्णधार पॅट कमिन्स याने एका स्थानाने प्रगती करत चौथे स्थान पटकावत, भारताच्या रविचंद्रन अश्विनला पाचव्या स्थानी खेचले. रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर कायम आहे.
Web Title: Bumrah retains top spot, Test rankings; Brooke dominates batsmen
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.