नवी दिल्ली : बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात बदल केला. लोकेश राहुल पाचव्या कसोटीलादेखील मुकणार आहे. उपकर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र रांची कसोटीनंतर विश्रांती घेत धर्मशाला येथे ७ मार्चपासून सुरू होत असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत खेळणार आहे.
राहुलच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चार सामन्यांंना मुकला. तो हैदराबाद येथे पहिली कसोटी खेळला होता. बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूने राहुलच्या दुखापतीची आणि फिटनेसची पाहणी केली. त्यानंतर लंडनमधील जाणकारांकडून तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला.
भारताने रांची येथे चौथी कसोटी जिंकून मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी संपादन केली आहे. अखेरच्या कसोटीत राहुलच्या अनुपस्थितीचा अर्थ असा की, रजत पाटीदार संघात कायम असेल. मात्र, तो अंतिम एकादशमध्ये खेळेल का, हे निश्चित नाही. त्याने सहा डावांमध्ये केवळ ६३ धावा केल्या.
अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यालादेखील भारतीय संघातून रिलीज करण्यात आले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सुंदर हा २ मार्च रोजी मुंबईविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी करंडकाच्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूकडून खेळेल. गरजेनुसार रणजी सामना संपल्यानंतर तो पुन्हा भारतीय संघात दाखल होऊ शकतो. राहुल हा आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करणार आहे. त्यासाठी त्याला २२ मार्चआधी पूर्ण फिट व्हावे लागेल. याच जखमेमुळे राहुल मागच्या वर्षी जवळपास चार महिने क्रिकेटपासून दूर होता. सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेद्वारा त्याने पुनरागमन केले. मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील अनिर्णीत कसोटी मालिकेत शतक झळकविणारा राहुल हा एकमेव फलंदाज होता.
शमीचे लवकरच पुनर्वसनमोहम्मद शमीवर २६ फेब्रुवारी रोजी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली. तो उजव्या पायाच्या टाचेच्या दुखापतीने हैराण होता. तो सध्या चांगल्या प्रकारे रिकव्हर होत आहे. तो लवकरच बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल. तेथे तो पुनर्वसन प्रक्रिया सुरू करेल.
पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), केएस भरत (यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.