कसोटी मालिका २-० ने जिंकून भारताने विंडीज दौऱ्याचा यशस्वी शेवट केला. एकदिवसीय आणि टी२० विजयानंतर कोहली अॅण्ड कंपनीने खºया अर्थाने यजमानांचा सफाया केला. कॅरेबियन संघाचा बलाढ्य भारतापुढे टिकावही लागला नाही. या नामुष्कीच्या पराभवानंतर यजमान संघ व्यवस्थापनातील अनेक उणिवा चव्हाट्यावर आल्या आहेत.
विंडीज संघात प्रतिभेची उणीव नाही. तथापि या प्रतिभेला योग्यरीत्या पैलू पाडण्याची गरज आहे. योग्यरीत्या उणिवा दूर सारल्यास विंडीजच्या क्रिकेटला पुन्हा नवी दिशा मिळू शकेल. विश्वचषकापाठोपाठ भारताचा विंडीज दौरा काही खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण होता. सलामीच्या जोडीची समस्या अद्याप कायम आहे. मयांक अग्रवाल याने योग्यता सिद्ध केली पण त्याला अधिक संधी मिळण्याची गरज आहे. त्याचा जोडीदार गवसलेला नाही. लोकेश राहुल नव्या चेंडूवर चाचपडतो. मी रोहित शर्मा हा योग्य पर्याय असल्याचे म्हटले होते. त्याला संधी दिल्यास सलामीची समस्या कायमची निकाली लागेल, असे माझे मत आहे. विश्वचषकात मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती कसोटीत करण्यात रोहित प्रभावी ठरला असता. रहाणे आणि हनुमा विहारी यांनी मात्र मधल्या फळीत मिळालेल्या संधीचे सोने केले.या दौºयाचे फलित मात्र भारतीय वेगवान मारा आणि विशेषत: जसप्रीत बुमराह ठरला. बुमराहने स्वत:च्या कामगिरीत वेगवान सुधारणा घडवून आणली. विश्व क्रिकेटवर आगामी काळात बुमराह वर्चस्व गाजविणार आहे. जखमांवर मात केल्यास हा गोलंदाज तिन्ही प्रकारात प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या नाकीनऊ आणू शकतो. ईशांत आणि शमी हे बुमराहला पूरक ठरत आहेत.याशिवाय अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव, नवदीप सैनी हे देखील राखीव फळीत आहेतच. सध्याच्या संघात संतुलन घडवून आणण्यासाठी वेगवान माºयाचा वापर करण्यात येत आहे.
फिरकी माºयातही अश्विन, कुलदीप आणि जडेजा हे कसोटी क्रिकेटमध्येही कामगिरीस सज्ज असतात. अशावेळी कर्णधार विराट कोहलीसाठी संघ निवडताना अनेक पर्याय उपलब्ध असतील. या गोलंदाजांचा शिताफीने वापर करणे त्याच्यासाठी अवघड आव्हान असणार आहे. (गेमप्लान)