- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर )
इंग्लंडविरुद्ध हैदराबाद कसोटीत भारताला चौथ्या डावात २५० धावांचे जरी लक्ष्य मिळाले तरी सामना अतिशय रोमांचक ठरू शकतो. खेळपट्टी अद्याप उखडलेली नाही. खेळपट्टी उखडली तरी इंग्लंडकडे भारतीय फलंदाजांना अडचणीत आणतील असे फिरकीपटू नाही. पण तरीही त्यांना कमी लेखून चालणार नाही. इंग्लंडचे फलंदाज चौथ्या दिवशी एक सत्र जरी खेळले तरी सामना बरोबरीचा होईल आणि दुसरे सत्र खेळले तर यजमान अडचणीत येऊ शकतील. सामन्याचा निकाल अनिश्चित असला तरीही सामना
चुरशीचा असेल यात शंका नाही.
मात्र, हैदराबाद कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे यात शंकाच नाही. पण फलंदाज स्थिरावला तर तो धावाही करू शकतो. अशा परिस्थितीत तिसऱ्या दिवशीप्रमाणे चौथ्या दिवशीही बुमराहचे चेंडू स्विंग झाले तर तो भारतासाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरेल. ओली पोप आणि रेहान अहमद यांची फलंदाजी पाहता भारतीय संघ बुमराहच्या रिव्हर्स स्विंगवर अवलंबून राहू शकतो.
पोपने करून दिली पीटरसनची आठवण
पोपने आपल्या खेळीमुळे केव्हिन पीटरसनची आठवण करून दिली. पीटरसनने २०१२-१३ च्या मालिकेत मुंबईत १७६ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली होती. पीटरसनच्या खेळीमुळे इंग्लंड संघ पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला आणि त्यांनी मालिकाही जिंकली. आधी जो सामना दोन-अडीच दिवसांचा आणि भारतासाठी एकतर्फी वाटत होता तो चौथ्या दिवसापर्यंत पोहोचला. कसोटी क्रिकेटसाठी ही खूप सकारात्मक बाब आहे.
Web Title: Bumrah will be the trump card
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.