नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या व अखेरच्या कसोटीत खेळणार नाही. २७ वर्षांच्या बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयकडे सुटी मागितली होती, ती स्वीकारण्यात आली आणि नंतर त्याला मालिकेतून माघार घेण्याची परवानगी देण्यात आली होती. जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकणार असल्याने त्याने माघार घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
बुमराहने लग्नाच्या तयारीसाठी सुटी घेतली असल्याचे बीसीसीआयने बुधवारी स्पष्ट केले. ‘मी लग्न करणार आहे आणि लग्नाच्या तयारीसाठी सुटी हवीय’ असे बुमराहने बीसीसीआयला कळविले होते. याच आठवड्यात बुमराहचे शुभमंगल होणार असल्याची चर्चा आहे.लग्नानंतरही बुमराह क्रिकेटच्या मैदानावर परतणार नाही. तो आता थेट आयपीएल २०२१ च्या १४ व्या पर्वात खेळताना दिसणार आहे.
गोव्यात होऊ शकतो विवाह सोहळाबुमराहची वाग्दत्त वधू स्पोर्ट्स अँकर आहे. या दोघांचा विवाह सोहळा गोव्यात पार पडणार असल्याचे समजते. याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू असल्याने संघातील सर्वच सहकारी बायोबबलमध्ये आहेत. त्यामुळे कुणीही विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही. बुमराह हा मूळचा अहमदाबादचा आहे. आता त्याचे कुटुंबीय मात्र मुंबईत वास्तव्य करतात. कोरोनामुळे लग्नाला मर्यादित संख्येत कुटुंबीय आणि आप्तेष्ट सहभागी होतील. याच कारणामुळे हे लग्न गोव्यात होणार असल्याचे समजते.