India vs Bangladesh, 1st Test, Day 2 : चेन्नई कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव ३७६ धावांत आटोपल्यानंतर बांगलादेशनं आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. पण भारतीय गोलंदाजीसमोर त्यांची अवस्था एकदम बिकट झाली. आधी बुमराहचा धाक अन् त्यानंतर आकाश दीपनं सोडलेली छाप यापुढं बांगलादेशचा संघं उपहारापूर्वीच बॅकफूटवर गेला आहे. पहिल्या डावातील सुरुवातीच्या ९ षटकात बांगलादेशच्या संघाने २६ धावांत आघाडीच्या ३ विकेट्स गमावल्या आहेत.
बुमराहनं पहिल्या ओव्हरमध्ये फोडली सलामी जोडी कमालीच्या चेंडूवर फलंदाज चारीमुंड्याचित
शादमान इस्लाम (Shadman Islam) आणि झाकीर हसन या जोडीनं बांगलादेशच्या पहिल्या डावाची सुरुवात केली. दुसरीकडे भारतीय कॅप्टन रोहित शर्मानं अपेक्षेप्रमाणे चेंडू बुमराहच्या हाती सोपवला होता. बुमराहनं पहिल्या षटकातील अखेरच्या कमालीच्या चेंडूवर शादमान इस्लाम याला चकवा देत त्याला बोल्ड केले. त्याने टाकलेला चेंडू कळण्याआधी इस्लामचा त्रिफळा उडला होता. अवघ्या २ धावांवर बुमराहनं बांगलादेशला पहिला धक्का दिला.
आकाश दीपची स्टंप तोड गोलंदाजी; बॅक टू बॅक दोन विकेट्स
बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना ब्रेक देत रोहितनं चेंडू आकाश दीपच्या हाती सोपवला. तो डावातील सातवे षटक घेऊन आला. या षटकात त्याने फक्त एक धाव खर्च केली. त्यानंतर डावातील नवव्या आणि आपल्या दुसऱ्या षटकात त्याने पाठोपाठ दोघांनी तंबूचा रस्ता दाखवला. ९ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर आकाशनं झाकीर हसन याला बोल्ड केलं. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या मोमीनुल याला तर आकाश दीपनं आल्यापावली माघारी धाडले. तो हॅटट्रिकवर पोहचला होता. ते शक्य झालं नसलं तरी त्याची स्टंप तोड गोलंदाजी चर्चेचा विषय ठरत आहे.
टीम इंडियाला ४०० च्या आत आवरलं, पण ते २०० पर्यंत टीकतील का?
बांगलादेशच्या संघाने भारतीय संघाला पहिल्या डावात ४०० धावांच्या आत रोखण्यात यश मिळवलं. पण भारतीय गोलंदाजीसमोर त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे. अवघ्या २६ धावांत ३ विकेट्स गमावल्यानंतर त्यांच्यासमोर भारतीय संघाने काढलेल्या धावांच्या निम्म्या धावा करणंही आव्हानात्मक झाले आहे. ते २०० पर्यंत टिकणंही अवघड वाटते. कॅप्टन शांतोसह अन्य फलंदाज कितपत तग धरणार ते पाहण्याजोगे असेल.