नवी दिल्ली : शरीरक्रिया विज्ञानचे प्राध्यापक डॉ. सायमन फेरोस यांच्या मते जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजी शैलीमुळे त्याच्या पाठीच्या खालच्या भागाला दुखापत होण्याची शक्यता अधिक आहे. फेरोस व प्रसिद्ध फिजिओ जॉन ग्लोस्टर आॅस्ट्रेलियातील व्हिक्टोरियामध्ये डिकिन विद्यापीठाच्या क्रीडा विभागासोबत जुळलेले आहेत. त्यांनी भारताच्या वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजी शैलीचा अभ्यास केला. जगात क्रीडा विज्ञानामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या डिकिन विद्यापीठाचा व्यायाम व पोषण विज्ञान विभाग आपल्या क्षेत्रात अव्वल स्थानी आहे.
फेरोस म्हणाले, ‘बुमराह फ्रंट फूट लाईनच्या बाहेर चेंडू रिलीज करतो. याचा अर्थ तो चेंडूला पुश करू शकतो. त्यामुळे तो उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी चांगला इन स्विंग चेंडू टाकू शकतो. जर त्याने ४५ अंशापेक्षा अधिक वाक दिला (माझ्या मते तो काही वेळा तसे करतो) तर त्याच्या शैलीमुळे त्याच्या पाठीच्या खालच्या भागाला दुखापत होण्याची समस्या उद््भवू शकते.’ बुमराहला प्रदीर्घ कालावधीपर्यंत दुखापतीविना खेळणे शक्य होणार नाही, अशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, फेरोस व ग्लोस्टर यांनी काही सकारात्मक बाबीही सांगितल्या.
फेरोस म्हणाले, ‘मज्जारज्जूचा खालचा भाग आणि खांद्याच्या हालचालीसह त्याची चेंडू टाकण्याची शैली बघितल्यानंतर बुमरहाची शैली सुरक्षित भासते. त्यामुळे त्याच्या मणक्यावर अतिरिक्त दबाव येत नाही.’ ग्लोस्टर म्हणाले, ‘त्याची अनोखी शैली त्याला सातत्याने तशी गोलंदाजी करण्यास सहायक ठरते, विशेषत: यॉर्कर. लसिथ मलिंगा त्याच्या अनोखा शैलीमुळे यशस्वी ठरला.’ ग्लोस्टर यांनी बुमराहच्या शैलीचा अभ्यास केल्यानंतर सांगितले की, त्याचे शरीर एक ‘चांगली मशीन’ आहे. त्याचसोबत त्याच्या प्रशिक्षकांचीही प्रशंसा करायला हवी. त्यांनी त्याच्या शैलीसोबत छेडछाड केली नाही. (वृत्तसंस्था)
ग्लोस्टर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या १७ वर्षांपासून कार्य करीत आहेत. साडेतीन वर्षे ते भारतीय संघाचे फिजिओ होते. मुख्य फिजिओ म्हणून जवळजवळ ५५ आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरे व मालिकांमध्ये सहभागी ग्लोस्टर म्हणाले, ‘बुमराहने आपल्या शैलीच्या मदतीसाठी आतापर्यंत स्नायू मजबूत केलेले आहेत. त्यामुळे शैलीवर त्याचे नियंत्रण आहे. त्याचे शरीर चांगले मशीन आहे. त्याच्या गोलंदाजीचा विश्व क्रिकेटमधील प्रभाव बघता त्याच्या पूर्वीच्या प्रशिक्षकांची प्रशंसा करायला हवी. परफेक्ट शैली असलेला गोलंदाज तयार करण्यासाठी त्यांनी त्याच्या गोलंदाजी शैलीमध्ये कुठलाही बदल केला नाही.’
Web Title: Bumrah's special style is dangerous for him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.