कोलकाता : भारतात कपिल देवसारखा अष्टपैलू खेळाडू पुन्हा न घडण्यासाठी देशातील खेळाडूंचा व्यस्त कार्यक्रम जबाबदार असल्याचे मत माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने व्यक्त केले. हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूची तुलना देशातील पहिले विश्वकप विजेते कर्णधार कपिल देव यांच्यासोबत केली जाते.लक्ष्मणने एका पुरस्काराच्या यूट्यूब विमोचनादरम्यान म्हटले, ‘अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावणे कठीण असते. कपिल पाजी बळी घेऊ शकत होते आणि धावाही फटकावू शकत होते. ते भारताचे खरोखरच मॅचविनर होते. पण, सध्याच्या घडीला व्यस्त कार्यभारामुळे अष्टपैलू तयार करणे कठीण आहे.’लक्ष्मणने हार्दिकचे नाव न घेता सांगितले,‘काही खेळाडू थोडी झलक दाखवितात. कारण ते दोन्ही विभागावर मेहनत घेतात, पण शेवटी व्यस्त कार्यभार आणि भारतीय संघाच्या तिन्ही प्रकाराच्या क्रिकेटमधील व्यस्ततेमुळे हे कौशल्य कायम राखणे कठीण होते. ज्या खेळाडूंमध्ये खरेच अष्टपैलू होण्याची क्षमता असते, दुर्दैवाने ते दुखापतग्रस्त होतात. अशा स्थितीत त्यांना केवळ गोलंदाजी किंवा फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा लागतो.’लक्ष्मणने त्याचसोबत सांगितले की, कुठल्याही प्रकारच्या अष्टपैलूची तुलना कपिलसोबत करणे योग्य नाही. लक्ष्मण म्हणाला,‘कपिल देव केवळ एकच असू शकतो. तुलना केली तर खेळावर दडपण येते. केवळ एक महेंद्रसिंग धोनी किंवा एक सुनील गावसकर असू शकतो.दरम्यान, लक्ष्मणने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत भारताच्या पहिल्या पसंतीच्या यष्टिरक्षकासाठी ऋषभ पंतचे समर्थन केले. लक्ष्मण म्हणाला,‘भारताकडे अनेक पर्याय आहे. संजू सॅमसन चांगली फलंदाजी, यष्टिरक्षण व कर्णधारपदाचा विशेष अनुभव नसताना राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करीत आहे. याव्यतिरिक्त ईशान किशन आहे. के.एल. राहुलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली, त्यावेळी चांगली कामगिरी केली. पण, माझ्या मते यष्टिरक्षक फलंदाजाच्या भूमिकेसाठी ऋषभ पंतची निवड व्हायला हवी, मी त्याचे समर्थन करेल.’n पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रदीर्घ काळ विश्रांती घेणाऱ्या हार्दिकने यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सतर्फे गोलंदाजी केली नव्हती. n ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत त्याने केवळ पाच षटके टाकली, पण तो कसोटी मालिकेत खेळला नाही. तो इंग्लंडविरुद्धही चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळला नाही. n त्याने टी-२० मध्ये गोलंदाजी केली, पहिल्या दोन वन-डेमध्ये त्याने गोलंदाजी केली नाही. हार्दिकने अखेरच्या वन-डेमध्ये गोलंदाजी केली, पण सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सतर्फे अद्याप गोलंदाजी केलेली नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कामगिरीच्या ओझ्यामुळे अष्टपैलू घडत नाहीत
कामगिरीच्या ओझ्यामुळे अष्टपैलू घडत नाहीत
व्हीव्हीएस लक्ष्मणचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 4:22 AM