सेंच्युरियन - दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वनडे मालिकेत पहिल्यांदाच भारताने 5-1 अशा दणदणीत विजयाची नोंद केली. भारताच्या या विजयात सिंहाचा वाटा आहे तो कर्णधार विराट कोहलीचा. सहा सामन्यात तीन शतक झळकावणा-या विराटच्या खेळीचं कौतुक करताना अनेकांना शब्द अपुरे पडतायत. नेमक्या कुठल्या शब्दात विराटची पाठ थोपटावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या सर्वांना टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ऑक्सफर्डची नवी डिक्शनरी विकत घेण्याचा सल्ला दिला आहे.
माझा तुम्हाला एक सल्ला आहे. मी जर तुमच्याजागी असतो तर मी लगेच दुसऱ्यादिवशी पुस्तकांच्या दुकानात जाऊन ऑक्सफर्ड डिक्शनरीची नवी आवृत्ती विकत घेतली असती. ज्यामुळे कोहलीचे कौतुक करण्यासाठी मला माझा शब्दसंग्रह वाढवता आला असता असे शास्त्री माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. कोहलीचा या मालिकेवर कितपत प्रभाव पडला या प्रश्नावर शास्त्री म्हणाले कि, फलंदाज म्हणून कोहलीची कामगिरी उत्कृष्टच आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांविरुद्ध सहा सामन्यात 500 धावा. यापेक्षा मला जास्त काही सांगायची गरज आहे का ? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या वनडे मालिकेत विराट कोहलीने सहा सामन्यात एकूण 558 धावा केल्या. भारताच्या प्रत्येक विजयात कोहलीचे शतक निर्णायक ठरले.