Join us  

कोलकाताने सहजपणे उडवला राजस्थानचा धुव्वा

गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 7:08 AM

Open in App

जयपूर : गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यानंतर ख्रिस लीन (५०) व सुनील नरेन (४७) यांच्या तुफानी ९१ धावांच्या सलामीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने एकतर्फी सामन्यात बाजी मारत राजस्थान रॉयल्सचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानला २० षटकात ३ बाद १३९ धावांत रोखल्यानंतर कोलकाताने १३.५ षटकात केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात १४० धावा केल्या.

या दिमाखदार विजयासह कोलकाताने ८ गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. राजस्थान सातव्या स्थानी कायम आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर नाणेफेक जिंकून कोलकाताने क्षेत्ररक्षण स्वीकारत राजस्थानला मर्यादित धावसंख्येत रोखले. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना लीन आणि नरेन यांनी आक्रमक सुरुवात करताना राजस्थानच्या गोलंदाजीतील हवाच काढली. दोघांनी प्रत्येकी ६ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी केली. लीनने ३२ चेंडूत ५०, तर नरेनने २५ चेंडूत ४७ धावांचा तडाखा दिला.

दोघांनी ९१ धावांची वेगवान सलामी देत कोलकाताचा विजय निश्चित केला. श्रेयस गोपालने दोघांना बाद करुन राजस्थानला यश मिळवून दिले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. यानंतर रॉबिन उथप्पा (२६*) व शुभमान गिल (६*) यांनी संघाच्या विजयावर शिक्का मारला.तत्पूृवी, स्टिव्ह स्मिथने शानदार अर्धशतक झळकावत ५९ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह नाबाद ७३ धावांची खेळी केल्याने राजस्थानला समाधानकारक मजल मारता आली. प्रसिद्ध क्रिष्णाने दुसºयाच षटकात राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला (५) पायचीत पकडले. यानंतर जोस बटलर व स्टीव्ह स्मिथ यांनी संघाला सावरले.

बटलर-स्मिथ यांनी शांतपणे खेळ करताना दुसºया गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली. कोलकाताच्या गोलंदाजांनी धावांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले असले, तरी बळी घेण्यात मात्र ते अपयशी ठरले.

त्यामुळेच त्यांच्यावरील दडपण स्पष्ट दिसत होते. फॉर्ममध्ये असलेला जोस बटलरने ३४ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ३७ धावा केल्या. हॅरी गुरने याने बटलरला बाद करुन ही जोडी फोडली तेव्हा राजस्थानने ११.५ षटकात ७७ धावा केल्या होत्या. यानंतर स्मिथने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. यावेळी त्याला राहुल त्रिपाठी (६) व बेन स्टोक्स (७*) यांच्याकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने राजस्थानची मजल मर्यादित राहिली. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलकराजस्थान रॉयल्स : २० षटकात ३ बाद १३९ धावा (स्टीव्ह स्मिथ ७३, जोस बटलर ३७; हॅरी २/२५.)

पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १३.५ षटकात २ बाद १४० धावा (ख्रिस लीन ५०, सुनील नरेन ४७; रॉबिन उथप्पा नाबाद २६; श्रेयस गोपाल २/३५.)

टॅग्स :आयपीएल 2019