मँचेस्टर, अॅशेस 2019 : तब्बल एक वर्ष तो क्रिकेटपासून लांब होता. साऱ्या क्रिकेट विश्वाने त्याला दूर लोटले. पण आता तो अनेकांच्या गळ्यातील ताइत झाला आहे. ज्याच्या मनगटामध्ये जोर असतो, तो कोणालाच घाबरत नाही. त्यांनेही तेच केले. आपल्या मनगटाच्या ताकदीच्या जोरावर त्याने क्रिकेट विश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडले. आता तर त्याने सर डॉन ब्रॅडमन यांनाही पिछाडीवर टाकले आहे. ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथची.
सध्या सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत तर स्मिथने धावांची टांकसाळ उघडली आहे. गेल्या आठ डावांमध्ये स्मिथचा पन्नासपेक्षा जास्त सरासरी आहे. हे ब्रॅडमन यांनाही जमले नव्हते, अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा एकमेव खेळाडू ठरला आहे. गेल्या आठ डावांमध्ये स्मिथने 239, 76, नाबाद 102 , 83, 144, 142, 92 आणि 60 रन केले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंगलंडच्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला बुधवार पासून सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथने तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले आणि पुन्हा एकदा त्याने जगातला अव्वल फलंदाज का आहे, हे सिद्ध केले आहे. तसेच स्मिथने या सामन्यात एक अविश्वासनीय कव्हर ड्राइव्ह खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले. या जगावेगळा शॅाटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्य़ात ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॅार्नर पहिल्याच षटकात भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं 28 धावांवरच दोन विकेट गमावल्या. मात्र त्यानंतर स्मिथनं लाबुशेनसोबत 116 धावांची संयमी खेळी खेळत शतकी भागीदारी केली. यानंतर स्मिथनं बेन स्टोक्सच्या चेंडूवर जमिनीवर पडून जगावेगळा कव्हर ड्राइव्ह मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.