वेस्ट इंडिजच्या (west indies) अशा एका वेगवान गोलंदाजाबाबत आपण आज जाणून घेऊयात ज्याचा आजच्याच दिवशी ५१ वर्षांपूर्वी जन्म झाला होता. या गोलंदाजानं आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यानं केली होती. ७० च्या दशकात वेस्ट इंडिजच्या दिग्गज वेगवान गोलंदांच्या पंक्तीत जोएल गार्नर, पॅट्रीक पैटरसन आणि कर्टली अँब्रोस यांची नावं घेतली जातात. यांच्यासोबतच आणखी एक नाव घेतलं जातं ते म्हणजे कॅमरुन कफी (Cameron Cuffy).
७ फूट उंचीच्या या धिप्पाड गोलंदाजाची कहाणी जितकी रोमांचक आहे तितकीच मनाला चटका लावून जाणारी देखील आहे. कॅमरुन कफी यांचा आज वाढदिवस. कॅमरुन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९७० रोजी सेंट विन्सेंट अँड द ग्रेनाडियन्स येथे झाला होता. ६ फूट आणि ८ इंच इतकी उंची असलेल्या कॅमरुन यांनी आपल्या कसोटी क्रिकेट करिअरची सुरुवात भारतीय संघाविरुद्ध १९९४ साली केली होती. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या १५ सामन्यांचा कसोटी करिअरमध्ये सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) तीन वेळा बाद केलं आहे. कॅमरुन यांनी वेस्ट इंडिजकडून १५ कसोटी आणि ४१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. पण कामगिरीत सातत्य न राखता आल्यामुळे कफी यांना संघातून बाहेर जावं लागलं होतं.
अनोखा 'सामनावीर'कॅमरुन यांच्या नावावर एक अनोख्या विक्रमाची नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकही धाव काढता, एकही विकेट न घेता आणि एकही झेल न टिपता त्यांनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. झिम्बाब्वे विरुद्ध २३ जून २००१ रोजी झालेल्या कोकाकोला कपमध्ये त्यांनी ही कामगिरी केली होती. या सामन्यात कॅमरुन कफी यांनी आपल्या १० षटकांमध्ये २ षटकं निर्धाव टाकून केवळ २० धावा दिल्या होत्या. या सामन्यात इतर सर्व गोलंदाजांनी आपल्या १० षटकांमध्ये ३५ हून अधिक धावा दिल्या होत्या. वेस्ट इंडिजने या सामन्यात पाच विकेट्सच्या मोबदल्यात २६६ धावा केल्या होत्या. तर झिम्बाब्वेला केवळ २३९ धावा करता आल्या होत्या. या सामन्याचा सामनावीर म्हणून कॅमरुन कफी यांची निवड करण्यात आली होती.
कॅमरुन कफी यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत १५ कसोटी सामने खेळले असून ४३ विकेट्स घेतल्या आहेत. तर ४१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ बळी घेतलेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कफी यांनी ८६ सामन्यांमध्ये तब्बल २५२ बळी घेतले आहेत. तर ९८ कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या या तुफानी गोलंदाजाच्या नावावर १०५ विकेट्सची नोंद आहे.