NZ vs AUS 1st Test : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने ( Cameron Green ) याने चांगला चोप दिला. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची अवस्ठा ४ बाद ८९ अशी झाली असताना ग्रीन मैदानावर आला आणि त्याने शेवटच्या विकेटपर्यंत खिंड लढवून संघाला ३८३ धावांपर्यंत पोहोचवले. त्याने शेवटच्या विकेटसोबत ११६ चेंडूंत ८३ धावा जोडल्या.
स्टीव्हन स्मिथ ( ३१) व उस्मान ख्वाजा ( ३३) यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या होत्या. पण, मॅट हेनरीने या दोघांना माघारी पाठवले. त्यानंतर आलेले मार्नस लाबुशेन व ट्रॅव्हिस हेड हे अपयशी ठरले. मिचेल मार्शने ( ४०) काही काळासाठी ग्रीनला साथ दिली. पण, पुन्हा ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि विलियम ओ'रौके व स्कॉट कुग्लेइंज यांनी धक्के दिले. ग्रीन मैदानावर उभा होता आणि ७ बाद २११ वरून त्याने संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. जोश हेझलवूडसह त्याने १०व्या विकेटसाठी ८३ धावा जोडल्या. ग्रीनने २७५ चेंडूंत २३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद १७४ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ पूर्वी कॅमेरून ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे ट्रेंड केले होते. त्यानंतरच त्यांना हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेता आले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे ७ फलंदाज १४० धावांवर माघारी परतले आहेत.